पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) 2024-25 साठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पर्थमध्ये खेळली गेलेली पहिली कसोटी भारताने 295 धावांनी जिंकली. त्यानंतर ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून विजय मिळवला. तर गाबा कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे ही मालिका अजून 1-1 अशी बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांमधील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) खेळवला जाणार आहे.
या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये काही वादही पाहायला मिळाले आहेत. याच्या केंद्रस्थानी ऑस्ट्रेलियन मीडिया आहे, जो भारतीय संघाला लक्ष्य करत आहे. 21 डिसेंबर रोजी रवींद्र जडेजाच्या पत्रकार परिषदेदरम्यान (पीसी) देखील गोंधळ झाला. जडेजाने एमसीजी येथे पत्रकार परिषदेत भाग घेतला, जिथे अष्टपैलू जडेजाने भारतीय पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ही पत्रकार परिषद केवळ भारतीय मीडियासाठी ठेवण्यात आली होती, त्यामुळे जडेजाने हिंदीतच प्रश्नांची उत्तरे दिली.
जडेजाची पत्रकार परिषद ऑस्ट्रेलियन मीडियाला आवडली नाही. जडेजाने हिंदीत प्रश्नांना उत्तरे दिल्याने ऑस्ट्रेलियन पत्रकार नाराज झाले. पत्रकार परिषद संपल्यावर, ऑस्ट्रेलियन पत्रकारांना जडेजाला इंग्रजीत प्रश्न विचारायचे होते, तथापि जडेजाने पीसी संपवण्याचा निर्णय घेतला कारण त्याला हॉटेलची टीम बस पकडायची होती. भारतीय संघाचे मीडिया मॅनेजर मौलिन पारीख यांनी सांगितले की, जडेजाला वेळ नसल्याने इंग्रजीत प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत.
मात्र, ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी किमान एक प्रश्न इंग्रजीत घ्यावा, असा आग्रह धरला. यावर मीडिया मॅनेजर म्हणाले- माफ करा, आमच्याकडे सध्या वेळ नाही. आपण पाहू शकता की संघ वाट पाहत आहे. तेव्हा ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी पुन्हा विचारणा केली की केवळ एक तरी प्रश्न इंग्रजीत घेता येत नाही का? यावर मीडिया मॅनेजरने स्पष्ट केले की, ‘ही पत्रकार परिषद प्रामुख्याने भारतीय मीडियासाठी आयोजित करण्यात आली होती.’
मीडिया मॅनेजर पारीख यांच्या या प्रतिक्रियेने काही ऑस्ट्रेलियन पत्रकार चिडले. त्यांनी पारीख यांच्याशी वाद घालून गैरवर्तन केले. पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका भारतीय पत्रकाराच्या माहितीनुसार, ‘केवळ ऑस्ट्रेलियन मीडियाच नाही तर काही भारतीय पत्रकारही जडेजाला प्रश्न विचारू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या पत्रकार परिषदेदरम्यानही अनेक भारतीय पत्रकारांना वेळेअभावी प्रश्न विचारण्याची संधी मिळत नाही. पण भारतीय पत्रकारांनी कधीही वाद घातला नाही किंवा गैरवर्तन केले नाही.’
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेत दोनदा धूळ चारली आहे. भारत ज्यावेळी कांगारूंच्या भूमीवर कसोटी मालिका खेळायला जातो त्यावेळी तेथील मीडिया टीम इंडियावर जोरदार टीका करतात. त्यामुळे ऑस्ट्रेलियन मीडिया हा कांगारू संघातील 12वा खेळाडू म्हणून कुप्रसिद्ध आहे. 2008 चे ‘मंकीगेट’ प्रकरण असो की पंचांनी विरोधी संघाविरुद्ध दिलेले चुकीचे निर्णय असो ऑस्ट्रेलिया मीडियाने खलनायकाची भूमिका वटवली होती.
याआधी ऑस्ट्रेलियन मीडियाने मोहम्मद सिराज आणि विराट कोहलीवर निशाणा साधला होता. अशा परिस्थितीत सध्याच्या मालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. ॲडलेड कसोटीत ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने जल्लोष केला तेव्हा ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय वेगवान गोलंदाजावर जोरदार टीका केली. पण हेडने सिराजला उद्देशून केलेली टीप्पणी ऑस्ट्रेलियन मीडियाला तेव्हा विसर पडला होता.
सिराजने फक्त आनंद व्यक्त केला. त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण ट्रॅव्हिस हेडने त्याला चिडवले. त्या सामन्यानंतर सिराजला मॅच फीच्या 20 टक्के दंड आणि 1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला. पण हेडला दंड न करता केवळ 1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला.
मेलबर्नला पोहोचल्यावर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियन महिला टीव्ही पत्रकाराशी वाद झाला. आपल्या कुटुंबियांचे फोटो काढणा-या पत्रकाराला कोहलीने झापले. खरेतर कोहलीने महिला पत्रकाराला फोटो न काढण्याची विनंती केली होती. पण पत्रकाराने कोहलीचे ऐकले नाही. यावरून कोहलीचा त्या महिला पत्रकाराशी वाद झाला. ऑस्ट्रेलियन कायद्यानुसार, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही सेलिब्रिटीचे व्हिडिओ किंवा छायाचित्रे काढण्यावर कोणतेही बंधन नाही.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यू इश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज , आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
शेवटच्या दोन कसोटींसाठी ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन , नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.