पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात गाबा येथे तिसरी कसोटी खेळली जात आहे. सामन्याचा दुसरा दिवस संपला असून कांगारू संघाने 7 विकेट गमावून 405 धावा केल्या आहेत. ॲलेक्स कॅरी (45*) आणि मिचेल स्टार्क (7*) अजूनही नाबाद आहेत. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार शतकी खेळी खेळली. भारताच्या जसप्रीत बुमराहने अचूक मारा करत 5 बळी घेतले.
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी केवळ 13.2 षटकेच खेळता आली. एकेकाळी कांगारू संघाचे 3 फलंदाज केवळ 75 धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेले होते. येथून स्मिथ (101) आणि हेड (152) यांनी डावाची धुरा सांभाळली आणि दोघांमध्ये 302 चेंडूत 241 धावांची भागीदारी झाली. भारताकडून बुमराहने 5 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि नितीश रेड्डी यांनी 1-1 बळी मिळवला.
हेडने 115 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. त्याने 160 चेंडूंचा सामना करत 152 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 18 चौकार आले. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील 9वे शतक असून भारतीय संघाविरुद्धचे तिसरे शतक आहे. हेडने यापूर्वीच्या ॲडलेड कसोटीतही शतक झळकावले होते.
भारताविरुद्ध गाबा येथे कसोटी शतक झळकावणारा हेड हा 5वा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. त्यांच्या आधी मार्नस लॅबुशेन, जस्टिन लँगर, स्मिथ आणि डॉन ब्रॅडमन यांनी ही कामगिरी केली आहे.
स्मिथने 190 चेंडूत 101 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 12 चौकार आले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे 33वे शतक होते तर भारतीय संघाविरुद्धचे 10वे शतक होते. 2024 मधील त्याचे हे पहिले कसोटी शतक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाजही स्मिथ बनला आहे. त्याने रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. पाँटिंगने भारताविरुद्ध 14 शतके झळकावली होती. स्मिथने आता 15 शतके केली आहेत.
स्मिथच्या कसोटी कारकिर्दीतील हे 33 वे शतक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांना मागे टाकले आहे. दोन्ही फलंदाजांनी 32 कसोटी शतके झळकावली आहेत. वॉने 168 कसोटी सामन्यांमध्ये 32 शतके झळकावली होती. स्मिथने इंग्लंडचा माजी महान खेळाडू ॲलिस्टर कूकची बरोबरी केली आहे. कुकने आपल्या कसोटी कारकिर्दीत 161 सामने खेळले आणि 291 डावात 33 शतके झळकावली.
स्मिथ आता ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. पाँटिंग पहिल्या स्थानावर आहे. त्याने 168 कसोटी सामन्यांच्या 287 डावांमध्ये 41 शतके झळकावली आहेत. स्मिथ आता 33 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सक्रिय खेळाडूंपैकी केवळ इंग्लंडच्या जो रूटने स्मिथपेक्षा जास्त शतके झळकावली आहेत. त्याने आपल्या बॅटने 152 कसोटीत 36 शतके झळकावली आहेत. विराट कोहलीच्या नावावर कसोटीत 30 शतके आहेत.
कांगारूंविरुद्ध बुमराहने 5 बळी घेण्याची ही तिसरी वेळ आहे. त्याने ही किमया तिन्हीवेळा ऑस्ट्रेलियामध्ये केली आहे. पाच विकेट्स घेण्याची ही त्याची कसोटी कारकिर्दीतील एकूण 12वी वेळ आहे. बुमराह आता SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) सर्वाधिक वेळा 5 बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. यासह त्याने कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. कपिल देव यांनी SENA देशांमध्ये 7 वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या.
सर्वाधिक 5 बळी घेणारा बुमराह भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने झहीर खान आणि इशांत शर्माला मागे टाकले आहे. या दोघांनी प्रत्येकी 11 वेळा 5 विकेट घेतल्या होत्या. कपिल देव (23 वेळा) हे या यादीत अव्वल स्थानी आहेत.