AUS vs IND 3rd ODI :
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा तब्बल ९ विकेट्स राखून पारभव केला. भारतानं जरी मालिका गमावली असली तरी या वेदनेवर रोहित शर्माच्या शतकी अन् विराटच्या अर्धशतकी खेळीने फुंकर घातली गेली. ऑस्ट्रेलियाचे २३७ धावांचे आव्हान भारतानं ३८.३ षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार केलं.
भारताकडून रोहित शर्मानं नाबाद १२१ धावा तर विराट कोहलीनं नाबाद ७४ धावांची खेळी केली. कर्णधार शुभमन गिलनं २४ धावांचं योगदान दिलं.
ऑस्ट्रेलिायचे २३७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं आक्रमक सुरूवात केली. रोहित आणि शुभमन गिलनं ६९ धावांची सलामी दिली. मात्र हेजलवूडनं गिलला २४ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.
गिल बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहलीने सलग दोन भोपळ्यांचा डाग पुसून काढण्याच्या दृष्टीकोणातून फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्यानं सेट झालेल्या रोहितला चांगली साथ देत भारताला शतकी मजल मारून दिली. रोहितनं आपलं सलग दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. पाठोपाठ विराटनं देखील अर्धशतकी खेळी केली.
या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १६८ धावांची भागीदारी रचत भारताला षटकात विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मनसुबा हा आक्रमक खेळून मोठी धावसंख्या उभारण्याचा होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी सेट झालेल्या फलंदाजांची विकेट घेत हा मनसुबा उधळून लावला. भारतानं ऑस्ट्रेलियाला २३६ धावात गुंडाळलं. भारताकडून हर्षित राणानं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याला वॉशिंग्टन सुंदरनं २ तर सिराज, कृष्णा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेत चांगली साथ दिली. कांगारूंकडून मॅट रेनशॉनं सर्वाधिक ५६ धावा केल्या. मिचेल मार्शने ४१ तर शॉर्टनं ३० धावांचं योगदान दिलं.
रोहित शर्मानं १०५ चेंडूत शतकी खेळी करत अजून आपलं क्रिकेट जिवंत असल्याचं दाखवून दिलं. त्याच्या जोडीला विराट कोहलीनं देखील अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी नाबाद १३१ धावांची भागीदारी रचत भारताला २०० धावांच्या पार पोहचवलं.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवलं. रोहित शर्मा शतकाच्या उंबरठ्यावर आहे तर विराटच्या बॅटमधून देखील अर्धशतकी खेळी आली आहे.
शुबमन गिल २४ धावांचे योगदान देऊन बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीनं भारताच्या विजयाचा भक्कम पाया रचण्यास सुरूवात केली. रोहितनं अर्धशतक (नाबाद ५८) झळकावलं तर विराटही त्याला उत्तम साथ देत आहे.
ऑस्ट्रेलियाला २३६ धावात गुंडाळल्यानंतर भारतानं आश्वासक सुरूवात केली. पहिल्या ५ षटकात भारतानं ३० धावांचा टप्पा पार केला. यात रोहितचं १७ धावांचं योगदान आहे.
हर्षित राणानं आजच्या सामन्यात ४ विकेट्स घेत आपली संघातील निवड सार्थ ठरवली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियाला २३६ धावात ऑल आऊट केलं.
हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दमदार गोलंदाजी करत ४ बाद १८३ धावांवर असणाऱ्या कांगारूंची अवस्था ७ बाद २०२ अशी केली. या दोघांना कुलदीप यादवनं देखील एक विकेट घेत चांगली साथ दिली.
विराट कोहलीने मॅथ्यू शॉर्टचा जबरदस्त कॅच पकडत कांगारूंना तिसरा धक्का दिला होता. मात्र त्यानंतर रेनशॉ आणि कॅरीनं आक्रमक फलंदाजी करत डाव सावरला.
पहिल्या १० षटकात जवळपास बॉल टू रन करणाऱ्या कांगरूंचा टीम इंडियानं लगाम खेचला. अक्षर पटेलनं सलामीवीर मार्शला ४१ धावांवर बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावगती थोडी मंदावली.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरूवात केली. त्यांनी १२. १ षटकात एक बाद ७२ धावांपर्यंत मजल मारली.
मोहम्मद सिराजनं ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानं ट्रॅविस हेडला २९ धावांवर बाद केलं.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. अर्शदीप आणि रेड्डीच्या ऐवजी कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळाली आहे.