राजगीर (बिहार) : वृत्तसंस्था
पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेतील सुपर-4 टप्प्यातील अखेरच्या सामन्यात भारताने चीनचा अक्षरशः धुव्वा उडवला. भारतीय संघाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व गाजवत 7-0 असा एकतर्फी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली.
भारताने या सामन्यात पहिल्या सत्रापासूनच जोरदार वर्चस्व गाजवत चीनला अजिबात डोके वर काढू दिले नाही. सातत्याने आक्रमणे चढवत त्यांनी चीनच्या बचाव फळीच्या मर्यादा अधोरेखित केल्या. भारतातर्फे चौथ्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला गेला आणि तिथून जणू गोलचा धडाकाच सुरू झाला.
या विजयामुळे भारताने सुपर-4 गुणतालिकेत 7 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. गतविजेते कोरिया 4 गुणांसह दुसर्या स्थानावर राहिले. आता अंतिम सामन्यात भारत आणि कोरियामध्ये थरारक लढत रंगणार आहे.