बुलावायो; वृत्तसंस्था : 19 वर्षांखालील (यू-19) वर्ल्डकप स्पर्धेत भारताने युवा न्यूझीलंडचा धुव्वा उडवत ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावले. आर. एस. अंबरीशचे चार बळी आणि कर्णधार आयुष म्हात्रेच्या झंझावाती 53 धावांच्या जोरावर भारताने साखळी फेरीतील आपला सलग तिसरा विजय नोंदवला. न्यूझीलंडला 36.2 षटकांत सर्वबाद 135 धावांवर रोखल्यानंतर पावसाचा व्यत्यय आल्यानंतर भारतीय युवा संघाला 37 षटकांत 130 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. ते भारतीय युवा संघाने 13.3 षटकांतच 3 गड्यांच्या बदल्यातच पार केले. दुसर्या एका सामन्यात, निहार परमारच्या अष्टपैलू कामगिरीमुळे (4 बळी आणि नाबाद 53 धावा) जपानने विश्वचषक इतिहासातील आपला पहिला विजय मिळवून इतिहास रचला.
पावसामुळे सामना 37 षटकांचा करण्यात आला. मात्र, न्यूझीलंडचा डाव सातत्याने गडगडत राहिला. एका क्षणी त्यांची अवस्था 7 बाद 69 अशी होती. कॅलम सॅमसन (नाबाद 37) आणि सेल्विन संजय (28) यांच्यातील आठव्या विकेटसाठी झालेल्या 53 धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. अंबरीशने संजयला बाद करून आपला चौथा बळी मिळवला, तर हेनिलने उर्वरित फलंदाजांना बाद करून न्यूझीलंडचा डाव संपवला.
विजयासाठी मिळालेल्या छोट्या लक्षाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर अॅरॉन जॉर्ज दुसर्याच षटकात बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी अवघ्या 6.3 षटकांत 76 धावा कुटून सामन्याचे चित्र बदलले. सूर्यवंशीने 23 चेंडूंत 2 चौकार, 3 षटकारांसह 40 धावा केल्या. दुसरीकडे, आयुष म्हात्रेने आपला आक्रमक पवित्रा कायम राखत अवघ्या 24 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत 6 षटकार आणि 2 चौकार लगावले. या मोठ्या विजयामुळे सुपर सिक्स फेरीत प्रवेश करताना भारताच्या नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा झाली आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड युवा संघ : 36.2 षटकांत सर्वबाद 135. (कॅलम सॅमसन 37. आर. एस. अंबरीश 4/29, हेनिल पटेल 3/23.)
भारतीय युवा संघ (टार्गेट : 37 षटकांत 130) : 13.3 षटकांत 3 बाद 130.(आयुष म्हात्रे 27 चेंडूंत 53, वैभव सूर्यवंशी 23 चेंडूंत 40).