दुबई; वृत्तसंस्था : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रविवारी (दि. 14) दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर यू-19 आशिया चषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध उभे ठाकत असून या निमित्ताने उभय संघांत आणखी एकदा जोरदार रस्सीखेच रंगेल, अशी अपेक्षा आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत सकाळी 10 वाजता खेळवली जाईल.
भारतीय संघाने यापूर्वी आपल्या पहिल्या सामन्यात यूएईचा एकतर्फी धुव्वा उडवला असून तोच धडाका येथेही कायम राखण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहेे. भारताने यूएईचा त्यावेळी 234 धावांनी धुव्वा उडवला होता. वैभव सूर्यवंशीने 95 चेंडूंमध्ये 171 धावांची खेळी करत भारतीय संघाला 433 धावांची विक्रमी धावसंख्या उभारून दिली आणि नंतर यूएईला 50 षटकांत केवळ 199 धावांवर समाधान मानावे लागले होते.
दोन्ही संघांचा जबरदस्त फॉर्म
यादरम्यान, पाकिस्तानने आपल्या सलामीच्या सामन्यात याहून मोठा विजय मिळवला. त्यांनी मलेशियाचा तब्बल 297 धावांनी धुव्वा उडवला होता. यू-19 पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 345 धावा केल्या आणि मलेशियाला 19.4 षटकांत अवघ्या 48 धावांवर गारद केले. भारत 19 वर्षांखालील संघाने ग्रुप ‘ए’ गुणतालिकेत 1 विजयासह दुसरे स्थान मिळवले आहे. एसीसी पुरुषांच्या 19 वर्षांखालील आशिया चषकात वैभव सूर्यवंशी हा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, त्याने 171 धावा केल्या आहेत, तर दीपेश देवेंद्रन हा भारतासाठी सर्वाधिक 2 बळी घेणारा गोलंदाज आहे. पाकिस्तान 19 वर्षांखालील संघाने ग्रुप ‘ए’ गुणतालिकेत 1 विजयासह पहिले स्थान पटकावले असून समीर मिन्हास हा पाकिस्तानसाठी सर्वाधिक 177 धावा करणारा फलंदाज आहे, तर अली रझा हा सर्वाधिक 3 बळी घेणारा गोलंदाज आहे.