स्पोर्ट्स

India host 2029 Champions Trophy : २०२९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भारताकडे; २०३१ च्या वनडे वर्ल्डकपचेही सहयजमानपद भूषवणार

ICC Cricket Calendar : भारतात तब्बल २३ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार, आयसीसीकडून २०३५ पर्यंतचे वेळापत्रक जाहीर

रणजित गायकवाड

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०३५ पर्यंतच्या प्रमुख पुरुष क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक आणि कालावधी रविवारी, १५ नोव्हेंबर रोजी जाहीर केला. या निर्णयानुसार, २०२९ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे एकहाती यजमानपद भारताकडे सोपवण्यात आले असून, २०३१ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे सहयजमानपद भारत बांगलादेशसोबत भूषवणार आहे. या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आयसीसी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या या वेळापत्रकानुसार, २०२९ ची चॅम्पियन्स ट्रॉफी ९ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत भारतात खेळवली जाईल. २००६ नंतर तब्बल २३ वर्षांनी या प्रतिष्ठित स्पर्धेचे भारतात पुनरागमन होत आहे. विशेष म्हणजे, विद्यमान विजेत्या भारतीय संघाला घरच्या प्रेक्षकांसमोर आपले जेतेपद राखण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळणार आहे. तसेच, २०३१ चा एकदिवसीय विश्वचषक ९ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान भारत आणि बांगलादेशमध्ये संयुक्तरित्या आयोजित केला जाईल.

भारताने यापूर्वी १९८७, १९९६ आणि २०११ मध्ये सहयजमान म्हणून, तर २०२३ मध्ये स्वतंत्रपणे या विश्वचषकाचे यशस्वी आयोजन केले होते. २०२३ च्या स्पर्धेत अहमदाबाद येथील अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे २०३१ मध्ये पाचव्यांदा विश्वचषकाचे यजमानपद भूषवताना जेतेपदावर नाव कोरण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. यापूर्वी २०२७ चा विश्वचषकही दक्षिण आफ्रिकेत ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीतच होणार आहे.

जागतिक क्रिकेटच्या या दीर्घकालीन आराखड्याबाबत बोलताना आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी स्पष्ट केले की, "आयसीसीच्या स्पर्धांचे वेळापत्रक हे जागतिक क्रिकेटच्या संरचनेचा अत्यंत महत्त्वाचा कणा आहे. या स्पर्धांमुळे खेळाला अधिक स्पर्धात्मकता आणि महत्त्व प्राप्त होते. खेळाडू आणि चाहत्यांसाठी हे सर्वोच्च क्षण असतात. सदस्य देशांना आणि खेळाडूंना या स्पर्धांची दीर्घकालीन स्पष्टता मिळाल्यास, त्यांना दर्जेदार सराव कार्यक्रम आखण्यास आणि नियोजनबद्ध दिनदर्शिका तयार करण्यास मोठी मदत होईल."

आयसीसीने २०२८ च्या टी-२० विश्वचषकापासून ते २०३५ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंतच्या सर्व प्रमुख स्पर्धांच्या तारखा निश्चित केल्या आहेत. यानुसार, टी-२० विश्वचषकाची अकरावी आवृत्ती १२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२८ दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पार पडेल. त्यानंतर २०३० चा टी-२० विश्वचषक ४ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाईल. पुढील दोन टी-२० विश्वचषक स्पर्धा १४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०३२ आणि ६ जुलै ते ६ ऑगस्ट २०३४ या कालावधीत नियोजित आहेत.

कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च मानला जाणारा जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) अंतिम सामना दर दोन वर्षांनी जून महिन्यातच होणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. यानुसार, २०२९ (८ ते १२ जून) आणि २०३१ (१२ ते १६ जून) या दोन्ही वर्षांचे अंतिम सामने इंग्लंडमध्येच आयोजित केले जातील. याशिवाय २०३३ मधील अंतिम सामना ९ ते १३ जून आणि २०३५ मधील अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान खेळवला जाईल. दुसरीकडे, २०३३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी २ ते २३ ऑक्टोबर दरम्यान, तर २०३५ चा एकदिवसीय विश्वचषक २ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, आयसीसीने २०३२ ते २०३५ या कालावधीत होणाऱ्या सर्व प्रमुख स्पर्धांच्या तारखा जाहीर केल्या असल्या तरी, या स्पर्धांचे यजमान देश अद्याप निश्चित केलेले नसून त्यांची घोषणा आगामी काळात केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT