टीम इंडियाचा 44 धावांनी विजय 
स्पोर्ट्स

भारताची सेमीफायनल ऑस्ट्रेलियाशी

IND vs NZ Match : टीम इंडियाचा 44 धावांनी विजय; न्यूझीलंडची लढत दक्षिण आफ्रिकेशी

पुढारी वृत्तसेवा

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढती आता निश्चित झाल्या असून, भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी, तर न्यूझीलंडची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. भारताने शेवटच्या साखळी लढतीत न्यूझीलंडला हरवून ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळवले. त्यामुळे भारताला आता सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी लढावे लागेल. रविवारी भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना संघाने 9 बाद 249 धावा केल्या, यानंतर त्यांनी किवीजना 205 धावांत गुंडाळले. श्रेयस अय्यरच्या 79 धावा आणि वरुण चक्रवर्तीच्या 5 विकेटस् हे भारतीय डावाचे वैशिष्ट्ये ठरले.

दुबईच्या मंद खेळपट्टीवर भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रचिन रवींद्र (6) याला हार्दिकने बाद केले. संघाच्या अर्धशतकापूर्वी विल यंग (22) सुद्धा बाद झाला. केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल यांनी थोडा वेळ डाव सावरला. कुलदीप यादवने ही 44 धावांची भागीदारी मोडताना मिशेलला (17) पायचित केले. रवींद्र जडेजाने गोलंदाजीत आपले योगदान देताना टॉम लॅथम (14) ला पायचित केले.

यानंतर वरुण चक्रवर्तीचे चक्रीवादळ आले. यात ग्लेन फिलिप्स (12), मायकेल ब्रेसवेल (2) यांना बाद केले. एका बाजूला पडझड होत असताना केन विलियम्सन मात्र भारतीय गोलंदाजांना दाद देत नव्हता, त्याने 77 चेंडूंत अर्धशतक केले. शेवटी त्याचा अडथळा अक्षर पटेलने दूर केला. पुढे येऊन मारण्याच्या नादात विल्यमसन मागे परतू शकला नाही. राहुलने त्याला यष्टिचित केले. त्याने 120 चेंडूंत 81 धावा केल्या. यावेळी सामना पूर्णपणे भारताच्या हातात होता, कर्णधार मिचेल सँटेनरने दोन षटकार मारून थोडी खळखळ केली. परंतु, वरुणने त्याची 28 धावांवर दांडी उडवली. पाठोपाठ मॅट हेन्रीला बाद करून वरुणने आपली पाचवी विकेट घेतली. ओ’रुर्कीची दांडी उडवून कुलदीपने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

तत्पूर्वी, मॅट हेन्रीचा भेदक मारा, ग्लेन फिलिप्स आणि केन विल्यमसन यांची जबरदस्त फिल्डिंग याच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला निर्धारित 50 षटकांत 9 बाद 249 धावांत रोखलेे. आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर श्रेयस अय्यरने दिलासा देणारी खेळी करताना 98 चेंडूंत 79 धावांची खेळी केली. याशिवाय अक्षर पटेलची 42 धावांची खेळी आणि हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकांत 45 चेंडूंत 45 धावांचे योगदान दिले.न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टॉस गमावल्यावर रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोडीने भारताच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 15 धावा असताना शुभमन गिल 7 चेंडूंत 2 धावा करून तंबूत परतला. मॅट हेन्रीने भारतीय संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर एक चौकार आणि एक षटकार मारून लयीत दिसणारा रोहित शर्मा 15 धावांवर बाद झाला. जेमिसनच्या गोलंदाजीवर विल यंगने त्याचा झेल टिपला. ग्लेन फिलिप्सने अप्रतिम कॅचसह विराट कोहलीचा खेळ 11 धावांवर खल्लास केला. आघाडीच्या फळीतील तीन फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर टीम इंडिया अडचणीत सापडली होती.

मग अय्यर आणि अक्षर पटेल जोडीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 98 धावांची दमदार भागीदारी रचली. अक्षर पटेल 61 चेंडूंत 42 धावा करून तंबूत परतला. के. एल. राहुलने 29 चेंडूंत 23 धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्या आणि जड्डू जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या; पण 20 चेंडूंत 16 धावा करून जडेजा माघारी फिरला. पंड्याने जोर लावला; पण तो शेवटपर्यंत टिकला नाही. त्याने अखेरच्या षटकांत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने भारतीय संघाच्या धावसंख्येत 45 चेंडूंत 45 धावांची भर घातली. पंड्या अखेरच्या षटकात आऊट झाला. मोहम्मद शमीच्या रूपात मॅट हेन्रीने या सामन्यातील पाचवा बळी टिपला. त्याच्याशिवाय कायले जेमिसन, विल्यम विल ओ’रुर्की, मिचेल सँटेनर आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी एक एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.

‘फ्लाईंग’ फिलिप्स

मॅट हेन्रीने विराट कोहलीची विकेट घेतली; पण या विकेटमध्ये ग्लेन फिलिप्सचे मोठे योगदान होते. मॅट हेन्रीने टीम इंडियाच्या डावातील 7 वे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने हवेत धारदार फटका लगावला. तिथे क्षेत्ररक्षण करणार्‍या ग्लेन फिलिप्सच्या दिशेने चेंडू हवेत गेला आणि त्याने हवेत उजव्या बाजूला झेप घेत नेत्रदीपक झेल टिपला. 0.62 सेकंदात फिलिप्सने रिअ‍ॅक्ट करत हा झेल टिपला. ग्लेन फिलिप्सने हा चेंडू टिपत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विराट कोहलीचा हा झेल ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’ असल्याची चर्चा सुरू आहे. फिलिप्सच्या झेलावर विराटचाही क्षणभर विश्वास बसला नाही, तर सामन्याचा आनंद घेण्यासाठी त्याला चिअर करण्यासाठी स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्का शर्माने डोक्यावर हात मारून घेतला.

भारत : 50 षटकांत 9 बाद 249 धावा. (श्रेयस अय्यर 79, हार्दिक पंड्या 45, अक्षर पटेल 42. मॅट हेन्री 5/42, रचिन रवींद्र 1/31.)

न्यूझीलंड : 45.3 षटकांत सर्वबाद 205 धावा. (केन विल्यम्सन 81, मिचेल सँटेनर 28. वरुण चक्रवर्ती 5/42, कुलदीप यादव 2/56.)

अशा होतील उपांत्य लढती

भारत वि. ऑस्ट्रेलिया

मंगळवार, दि. 4 मार्च दु. 2.30 वा

न्यूझीलंड वि. द. आफ्रिका

बुधवार, दि. 5 मार्च दु. 2.30 वा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT