T20 World Cup | भूवरी रावण वध झाला... File photo
स्पोर्ट्स

T20 World Cup | भूवरी रावण वध झाला...

पुढारी वृत्तसेवा

महाशिवरात्रीला भारतीय गोलंदाजांनी प्रेमदासा स्टेडियमवर तांडव केले आणि पाकिस्तानी फलंदाजांनी शरणागती पत्करली. पाकिस्तान भारताविरुद्ध सामना खेळणार नव्हते तेच त्यांच्या पथ्यावर पडले असते, असे आज तमाम पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना वाटत असेल. भारताविरुद्ध खेळायचा निर्णय घेऊन त्यांचा जो लाजिरवाणा दारुण पराभव झाला त्यापेक्षा न खेळता ‘झाकली मूठ सव्वा लाखाची...’ राहिली असती तर लाज तरी गेली नसती इतके वाईट पाकिस्तान खेळले. भारताची धावसंख्या जेव्हा 175 झाली तेव्हा दहा-पंधरा धावा कमी पडतील की काय असे वाटत होते, पण पाकिस्तानसाठी 175 हे त्यांच्यावरच्या जागतिक बँकेचे कधीही न फेडता कर्जासारखे वाटले. पाकिस्तानला हे लक्ष्य गाठायची एकच आशा होती ती त्या पहिल्या चार फलंदाजांवर म्हणजे फरहान, अयुब, आगा आणि बाबर आझम यांच्या कामगिरीवर. हे लक्ष्य गाठायचे दडपण घेऊन खेळताना पाकिस्तानची अवस्था जेव्हा 3 बाद 13 झाली तेव्हाच त्यांच्या विजयाच्या मनसुब्याचे तीन-तेरा वाजले.

ही खेळपट्टी संथ होती, पण भारताने नवा चेंडू प्रथम हार्दिक पंड्याच्या हातात ठेवला आणि त्याने घणाघाती फलंदाजी करू शकणार्‍या साहिबजादा फरहानला टिपले आणि पाठोपाठ बुमराहने सईम अयुब आणि कर्णधार सलमान आगाला एकाच षटकात टिपत पाकिस्तानचे आव्हान संपवून टाकले, पण पाकिस्तानचे खरे आव्हान हे त्यांनी भारताला 175 धावा करून दिल्यावरच संपले होते. पाकिस्तानचा गोलंदाजीचा बदल अनाकलनीय होता. त्यांचा या विश्वचषकातील सर्वात चर्चिलेला खेळाडू उस्मान तारिकला उशिरा गोलंदाजीला आणणे, फिरकीपटू धावा रोखून ठेवत असताना अबरार अहमद, शादाब किंवा स्वतः कर्णधार आगा शेवटचे षटक टाकू शकत असताना ज्याच्या वेगावर धावा होऊ शकतात त्या आफ्रिदीला शेवटचे षटक देऊन सोळा धावा देणे या चुका भारताच्या पथ्यावर पडल्या. भारताला दीडशेच्या आसपास पाकिस्तान रोखू शकले असते तर धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी फलंदाज सकारात्मकतेने सामोरे गेले असते. 176 धावांच्या ओझ्याखाली दे दाबून गेले आणि मनातून पाकिस्तान तेव्हाच सामना हरले.

कुलदीप विरुद्ध बाबर आझम लढत सुरू व्हायच्या आधीच अक्षर पटेलने बाबर आझमचा अडथळा दूर केला. अक्षर पटेलने फिरकीची बोहनी केल्यावर वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव हे हुकमी एक्के पाकिस्तानी फलंदाजांना नाचवत असताना तिलक वर्मानेही दोन बळी मिळवून पाकिस्तानला नामोहरम केले. पाकिस्तानला खरं तर शंभर धावांच्या आत आपण गुंडाळू शकलो असतो, पण शेवटच्या पंधरा धावांची खिरापत आपण वाटल्याने पाकिस्तानच्या नेट रनरेटला किंचित हातभार लावला. आज पाकिस्तान आपल्या गटात तिसर्‍या स्थानावर फेकले आहेत आणि नामिबियाविरुद्ध विजय मिळवणे त्यांना अनिवार्य झाले आहे. नामिबियाने करामत करून पाकिस्तानला हरवले तर यूएसए आणि पाकिस्तान यांच्यात नेट रनरेटवर दुसरा संघ पात्र ठरेल. या द़ृष्टीने पाकिस्तानचे शेपूट आपण लवकर गुंडाळले असते तर बरे झाले असते.

रविवारी संध्याकाळी जगभरातून कोलंबोत आलेल्या तमाम क्रिकेटप्रेमींना रविवारी पावसाने आपला खेळ आटोपता घेतल्याने हायसे वाटले. पावसामुळे खेळपट्टी आणि मैदान झाकून ठेवल्याने त्यात थोडा दमटपणा येऊन चेंडू थोडा थांबून येणार हे नक्की होते. संथ खेळपट्टीमुळे दोन्ही संघ फिरकीवर भर देणार हे स्पष्ट होते. भारताने या सामन्यासाठी अपेक्षेप्रमाणे दोन बदल करून संजू सॅमसनऐवजी तंदुरुस्त झालेल्या अभिषेक शर्माला संघात घेतले आणि पाकिस्तानविरुद्ध उत्तम रेकॉर्ड असणार्‍या कुलदीप यादवचा अर्शदीपच्या ऐवजी समावेश केला. या खेळपट्टीचा सुरुवातीला फायदा मिळेल म्हणून पाकिस्तान कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.

या सामन्याचे जे मॅच अप्स होते त्यात पहिला होता तो शाहिन शाह आफ्रिदी विरुद्ध अभिषेक शर्मा, पण डावाची सुरुवात सलमान आगाने चेंडू स्वतःकडे घेऊन केली. चेंडू नक्कीच बॅटवर थांबून येत होता आणि उत्तम ड्रिफ्ट मिळत होती. अभिषेक शर्माने तीन चेंडू निर्धाव खेळल्यावर दडपणाखाली येऊन पुढच्या चेंडूवर एक सोपा झेल मिड ऑनला काढून दिला. दुसर्‍या बाजूने शाहिन शाह आफ्रिदी चा समाचार इशान किशनने पहिल्याच षटकात घेतल्यावर त्याची गोलंदाजी थांबवून सलमान आगाने संपूर्ण फिरकी आक्रमण आणले. इशान किशनच्या पद्धतीने पाकिस्तानच्या फिरकीपटूंचा सामना करत होता आणि समाचार घेत होता ते बघता या खेळपट्टीवर फलंदाजी अगदी सोपी वाटायला लागली. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला उत्तम फटकेबाजी करून इशान किशनने अभिषेक शर्माच्या लंबक बाद होण्याचे दडपण दूर केले. इशान किशनचा या विश्वचषकातील खेळ बघता भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवर त्याला खेळायचा अनुभव दिसून येत आहे. ही रातोरात घडलेली किमया नाही तर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने जवळपास एकहाती विजेतेपद मिळवून देताना या संथ खेळपट्ट्यांवर खेळायचा त्याला उत्तम अनुभव मिळाला. इशान किशन आणि तिलक वर्माने 46 चेंडूंत 84 धावांची भागीदारी केली त्यात इशान किशनचा वाटा तब्बल 76 धावांचा होता.

भारतीय संघाची घोडदौड उत्तम चालू असताना इशान किशनला इथल्या दमट हवेचा फटका बसला आणि क्रॅम्प्स आणि हॅमस्ट्रिंगचा त्रास व्हायला लागला. त्याच्या उपचारादरम्यान जेव्हा खेळ थांबला तेव्हा त्याच्या खेळातला र्‍हिदम बिघडला. नवव्या षटकात भारताची धावसंख्या 88 होती त्यात इशान किशनच्या 77 धावा होत्या. यावरून इशान किशनने पाकिस्तानी गोलंदाजांची केलेली धुलाई दिसून येते. इतक्या सुस्थितीत असताना भारत दोनशेच्या टप्पा गाठेल, अशी आशा वाटायला लागली होती; पण इशान किशन बाद झाल्यावर धावांचा ओघ थंडावला. तिलक वर्मा जो सहायकाची भूमिका बजावत होता त्याने सूर्याबरोबर डाव रचला, पण सईम अयुबने भारताला लागोपाठ धक्के दिले. जी चूक अभिषेक शर्माने केली तीच हार्दिक पंड्याने केली आणि भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले.

इशान किशनच्या फलंदाजीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. भारत इशान किशनच्या खेळीने ‘सुपर 8’ गटात पोहोचला आहे. ‘सुपर 8’ च्या द़ृष्टीने तयारीसाठी आता अहमदाबादचा नेदरलँडचा सामना आपण खेळणार आहोत. अभिषेकला सूर गवसायलाही शेवटची संधी असेल नाहीतर आपल्याला सॅमसनचा पुन्हा विचार करावा लागेल. हे सर्व ठरवायला दोन दिवस आहेत. खेळाडूंच्या डोक्यावरचे मोठे ओझे या विजयाने उतरले असेल. रावणाचा लंकेत वध करून आपल्या संघाचे पुष्पक विमान उद्या अहमदाबादला निघेल तेव्हा संघात एक आत्मिक समाधान असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT