India England Tour : रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ निवडीबाबत आता चर्चा सुरु आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर कर्णधारपदासह वरच्या फळीतील दोन महत्त्वाच्या जागांसाठीच्या निवडीचे मोठे आव्हान बीसीसीआय समोर असणार आहे. विशेषतः, चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या जागी कोण खेळणार यावर मोठा खल सुरु आहे. या जागी शुभमन गिल आणि केएल राहुल यांना संभाव्य उमेदवार म्हणून घोषित केले जात असताना, माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी या यादीत आणखी एका नावाची समावेश केला आहे.
ESPNcricinfo वर बोलताना संजय बांगर म्हणाले की, "भारतीय कसोटी संघात चौथ्या क्रमांकावर करुण नायर हा मला अधिक योग्य वाटतो. कारण त्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कसोटीमध्ये स्थान परत मिळवण्यासाठी त्याने भरपूर परिश्रम घेतले आहेत." नायरबरोबरच बांगरने पश्चिम बंगालच्या अभिमन्यू ईश्वरन यालाही संधी देण्यात यावी, असे म्हटले आहे. अभिमन्यूनेखूप धावा केल्या आहेत. मला विश्वास आहे की तो कसोटी संघात स्थान मिळवेल," असेही बांगर म्हणाले.
करुन नायरने यंदाच्या देशांतर्गत हंगामात जबरदस्त पुनरागमन केले आहे. यंदाच्या करुनच्या विदर्भ संघाने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तसेच रणजी ट्रॉफीही जिंकली. या दोन्ही स्पर्धेत करुणने उत्तम कामगिरी केली आहे. नायर सध्या ३३ वर्षांचा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो वीरेंद्र सेहवागनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज आहे. मागील काही दिवसांमध्ये त्याने फलंदाजीमध्ये दाखवलेल्या सातत्याने आता निवड समितीला त्याचा विचार करावा लागणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातही आयपीएल २०२५ मध्ये पहिल्यांदाच खेळताना करुण नायरने दिल्ली कॅपिटल्स (डीसी) साठी ४० चेंडूत ८९ धावा फटकाल्या.
इंडिया अ सामन्यांमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात ईश्वरन अपयशी ठरला. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सराव सामन्यांसाठी इंडिया अ संघाचा कर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आली असल्याने त्याला आणखी एक संधी मिळू शकते.