India T20I Record Wankhede: मुंबईतील ऐतिहासिक वानखेडेवर गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. अंतिम फेरीसाठी दोन्ही संघ आमनेसामने येणार असल्याने हा सामना अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांनी स्पर्धेत आतापर्यंत सात पैकी सहा सामने जिंकले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीतील लढत अत्यंत चुरशीची असणार आहे. भारताने आतापर्यंत तीन वेळा टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्यापैकी दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. इंग्लंडनेही तीन अंतिम फेऱ्यांपैकी दोन वेळा विजेतेपद जिंकले आहे.
वानखेडे स्टेडियमवर भारताने आतापर्यंत सात टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने भारताने जिंकले, तर दोन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला.
या मैदानावर भारताची सर्वात मोठी धावसंख्या 247/9 अशी आहे. हा विक्रम इंग्लंडविरुद्ध 2 फेब्रुवारी 2025चा आहे. तर सर्वात कमी धावसंख्या अमेरिकेविरुद्ध 161/9 आहे, हा सामना 7 फेब्रुवारी 2026चा आहे.
या मैदानावर भारताचा सर्वात मोठा विजयही इंग्लंडविरुद्धच झाला आहे. 2025 मध्ये भारताने इंग्लंडचा तब्बल 150 धावांनी पराभव केला होता. विकेट्सच्या फरकाने सर्वात मोठा विजय श्रीलंकेविरुद्ध 2017 मध्ये झाला होता, तेव्हा भारताने पाच विकेट्सने सामना जिंकला होता. तर सर्वात मोठा पराभव वेस्ट इंडिजविरुद्ध 2016 मध्ये झाला होता, तेव्हा भारत सात विकेट्सने पराभूत झाला होता.
वानखेडेवर भारताकडून सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या आहेत. त्याने तीन सामन्यांत 197 धावा केल्या आहेत. या मैदानावर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या अभिषेक शर्माच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 54 चेंडूत 135 धावांची तुफानी खेळी केली होती.
स्ट्राइक रेटच्या बाबतीतही अभिषेक शर्मा आघाडीवर आहेत. त्याने दोन सामन्यांत 245.45 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. तसेच या मैदानावर सर्वाधिक षटकारांचाही विक्रम त्याच्या नावावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या त्याच सामन्यात त्याने 13 षटकार ठोकले होते.
वानखेडेवर भारताकडून सर्वाधिक विकेट्स मोहम्मद शमीने घेतल्या आहेत. त्याने दोन सामन्यांत पाच विकेट्स घेतल्या आहेत. या मैदानावरील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम शिवम मावीच्या नावावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 4/22 अशी कामगिरी केली होती.
वानखेडेवर सर्वाधिक सामने हार्दिक पंड्याने खेळले आहेत. त्याने पाच टी-20 सामने येथे खेळले आहेत. कर्णधार म्हणून MS धोनी आणि सूर्यकुमार यादवने प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. सूर्यकुमार यादवने खेळलेल्या दोन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे.
भारताने शेवटचा टी-20 सामना 7 फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध याच मैदानावर खेळला होता. त्या सामन्यात भारताने 29 धावांनी विजय मिळवला होता. आता इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना याच मैदानावर होणार असल्याने या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.