पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट फेडरेशन (ISSF) च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय नेमबाज सोनम उत्तम मस्कर हिने १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकले. तिने अंतिम फेरीत २५२.९ गुण मिळवले. तर आणखी एक भारतीय नेमबाज तिलोत्तमा सेन अंतिम फेरीत सहाव्या स्थानावर राहिली.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती चीनची नेमबाज हुआंग युटिंग हिने ISSF वर्ल्ड कप फायनलमध्ये २५४.५ गुणांसह सुवर्णपदक मिळवले. तर फ्रान्सच्या ओसेन मुलर हिला कांस्य पदक मिळाले.
२०२३ मध्ये दक्षिण कोरिया येथे झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सोनम मस्कर हिने सांघिक रौप्य पदकाचा वेध घेतला होता. सोनम ही पुष्पनगर (गारगोटी, जि. कोल्हापूर) गावची कन्या आहे.