नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सध्या सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने प्रेक्षकांचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. आयसीसीच्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याला 2.84 कोटी प्रेक्षक मिळाले आणि एकूण 187 कोटी मिनिटांचा वॉच टाईम (पाहण्याचा वेळ) नोंदवला गेला. हा सामना आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला महिला आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे.
आयसीसीने स्पष्ट केले आहे की, हा सामना प्रेक्षकांच्या संख्येच्या द़ृष्टीने सर्वोत्तम होता. तसेच, विश्वचषक लीग टप्प्याच्या पहिल्या सहामाहीत डिजिटल टीव्ही प्लॅटफॉर्मवर विक्रमी संख्या पाहायला मिळाली. कोलंबो येथे झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव केला होता.
टीव्हीवरील प्रेक्षक संख्या भारत-पाकिस्तान सामन्याने महिला विश्वचषक इतिहासात लीग स्टेजमधील सर्वाधिक टीव्ही प्रेक्षकसंख्या गाठली. श्रीलंका, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारताच्या सामन्यांसह पहिले 11 सामने एकूण 72 दशलक्ष (7.2 कोटी) प्रेक्षकांनी पाहिले. 2022 च्या विश्वचषकाच्या तुलनेत टीव्ही प्रेक्षकांच्या संख्येत 166 टक्के वाढ झाली आहे. या 11 सामन्यांमुळे एकूण 6.3 अब्ज मिनिटे पाहण्याचा वेळ निर्माण झाला.
डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षक संख्या आयसीसी आणि जिओहॉटस्टारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्पर्धेच्या पहिल्या 13 सामन्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधीच 6 कोटी प्रेक्षक मिळाले आहेत. 2022 च्या आवृत्तीच्या तुलनेत ही पाच पटीने मोठी वाढ आहे. पहिल्या 13 सामन्यांमध्ये एकूण 7 अब्ज मिनिटे पाहण्याचा वेळ नोंदवला गेला, जो मागील स्पर्धेपेक्षा 12 पट जास्त आहे. आयसीसीच्या अहवालानुसार, 12 ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याला जिओहॉटस्टारवर एकाच वेळी 48 लाख प्रेक्षक होते. हा आकडा महिला क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम आहे.