India Pakistan Tensions Pakistan Super League Matches Shifts To UAE
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांचा भारतीय सेनेने ठामपणे प्रतिकार केला आहे. भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे शत्रू देशाचे धाबे दणाणले असून, सीमारेषेवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय भूदल, वायुदल आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईमुळे पाकिस्तानकडून करण्यात आलेले हल्ले निष्फळ ठरले. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताकडून करण्यात आलेल्या प्रत्युत्तरामुळे शत्रूला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे.
भारताच्या या निर्णायक आणि प्रभावी कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनाक्रमाकडे लक्ष वेधले जात आहे. या प्रसंगामुळे भारतीय सैन्याची सजगता, ताकद आणि युद्धसज्जता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, भारताच्या या तडाख्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पळता भुई थोडी झाली आहे. पीसीबीकडून सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL)चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पाकिस्तानातील आणि इतर काही मोजक्या देशांमधील क्रिकेटपटू विविध फ्रँचायझी संघांकडून खेळत आहेत. पण भारताच्या घणाघाती प्रतिहल्ल्यामुळे पीएसएलचे सामने पाकिस्तानातून युएईमध्ये शिफ्ट करण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे PCBला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
पीसीबीने यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे पीसीबीने खेळाडूंची आणि अधिकाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. युएईमध्ये सामने खेळवणे हा सध्या सर्वांत सुरक्षित पर्याय आहे. लवकरच अधिकृत वेळापत्रक आणि स्थळांची घोषणा केली जाईल.’
या निर्णयामुळे पाकिस्तानमधील क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. ‘आमच्या देशातील क्रिकेट विदेशात खेळवली जाणार ही दुर्दैवाची गोष्ट आहे,’ असे नेटक-यांनी म्हटले आहे.
काही विश्लेषकांच्या मते, हा निर्णय केवळ सुरक्षेपुरता मर्यादित नाही, तर यामागे प्रायोजक, प्रसारण हक्क आणि आर्थिक हितसंबंधही कारणीभूत आहेत. पण आर्थिक तज्ज्ञांच्या मते पाकिस्तानला युएईमध्ये स्पर्धा घेणे म्हणजे एक प्रकारे त्यांची खाते आणखी रिकामे होणार आहे. परिणामी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे आधीच डबघाईत आहे, ते अजून रसतळाला जाईल, असे काहींचे मत आहे.