India vs Pakistan | महाशिवरात्रीला महामुकाबला File Photo
स्पोर्ट्स

India vs Pakistan | महाशिवरात्रीला महामुकाबला

पुढारी वृत्तसेवा

निमिष पाटगावकर

भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही, या अनिश्चिततेतून बाहेर पडल्यावर भारत-पाकिस्तान पेक्षा कोलंबोत उत्साहाचे वारे संचारले आहे. एका सामन्याने त्यांच्या अर्थव्यवस्थेला भरपूर हातभार लागणार असल्याने पर्यटनाशी निगडित सर्वच म्हणजे विमान कंपन्या, हॉटेल्स ते अगदी टॅक्सीवाले आपली दिवाळी साजरी करून घेत आहेत. भारतीय संघ स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवून शुक्रवारी रात्री कोलंबोत दाखल झाला, तेव्हा त्यांच्या स्वागताला मोठ्या गर्दीबरोबरच आकाशात पावसाचे ढगही आले. आज या महामुकाबल्यात पावसाच्या व्यत्ययाचा अंदाज व्यक्त केला आहे. सकाळी आणि दुपारी पावसाच्या सरींची शक्यता असली तरी संध्याकाळी उघडीप होऊन एखाद दुसरी सर येऊन सामन्यात व्यत्यय आणू शकते. एक चांगले आहे ते म्हणजे या प्रेमदासा स्टेडियमला निव्वळ खेळपट्टी आणि बाजूचा परिसर नाही तर संपूर्ण मैदान कव्हरने झाकायची सुविधा आहे. निसर्गाचे चक्र आपल्या हातात नाही तेव्हा सामन्याच्या द़ृष्टीने दोन्ही संघांची तयारी बघणे महत्त्वाचे ठरते.

या महत्त्वाच्या सामन्याला नवी खेळपट्टी नसून ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे सामन्याला वापरलेलीच खेळपट्टी वापरली जाणार आहे. प्रेमदासाची खेळपट्टी ही संथ आहे आणि त्यातून ही वापरलेली खेळपट्टी आहे. जरी ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे सामन्यात पडलेल्या 12 बळींपैकी 10 हे जलदगती गोलंदाजांनी मिळवले असले तरी आजच्या सामन्याला ही खेळपट्टी फिरकीला मदत करेल, असा अंदाज आहे. अर्थात, सकाळपासून पाऊस झाला आणि झाकलेल्या खेळपट्टीत जर हवेतील दमटपणा उतरला तर चित्र बदलू शकते. या पार्श्वभूमीवर भारतीय गोलंदाजीची प्रमुख धुरा बुमराह, हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्यावर असेल. बुमराहला नामिबियाविरुद्ध नवा चेंडू मिळाला नाही तरी या सामन्यात तो गोलंदाजीची सुरुवात करेल. भारताचे दुसरे अस्त्र वरुण चक्रवर्ती असेल. त्याने या सामन्यासाठी एक खास चेंडू तयार केला आहे, हे त्याने आधीच जाहीर करून पाकिस्तानच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली आहे. अर्शदीप का कुलदीप यादव यात माझी पसंती कुलदीप यादवला असेल. या संथ खेळपट्टीवर कुलदीप गोलंदाजीतील विविधतेने पाकिस्तानला अडचणीत आणेल. भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवरचे 3 फिरकी गोलंदाजांचा नेहमीचा यशस्वी फॉर्म्युला आपण आज वापरला पाहिजे. थोडक्यात जे धोरण आपण 2025 च्या आशिया चषकात दुबईला खेळताना वापरले तेच इथेही यशस्वी ठरेल. या पाच प्रमुख गोलंदाजांना गरज पडल्यास हातभार लावायला शिवम दुबे असेलच.

भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात विशेष बदल संभवत नाही. अभिषेक शर्मा का संजू सॅमसन याचे उत्तर आजच मिळेल. अभिषेक शर्मा तंदुरुस्त होऊन जर खेळला तर त्याच्याकडून शाहिन शाह आफ्रिदीची लय बिघडवायचे मुख्य काम असेल. संजू सॅमसन याही सामन्यात खेळणार असेल तर त्याला आपल्या तंत्रात सुधारणा करावी लागेल. सुनील गावसकरांनी त्याच्या बाद होण्याचे अचूक विश्लेषण करताना म्हटले आहे की, संजू त्याचा हवेतील फ्लिक खेळताना क्रीजमध्ये खूप मागे जाऊन खेळतो. यामुळे त्याला हवी ती उंची मिळत नाही आणि डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेट यांच्या मधून गेला तरच तो झेल जात नाही. जर नामिबिया अभ्यास करून सॅमसनसाठी क्षेत्ररक्षण लावू शकते तर पाकिस्तानने नक्कीच याचा अभ्यास केला असेल. भारताचे पहिले दोन सामने बघितले तर मधल्या फळीची कामगिरी या सामन्यात उंचावणे गरजेचे आहे. विशेषतः शिवम दुबे, रिंकू सिंग आणि अक्षर पटेल यांच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. मोठ्या स्पर्धेत खेळायचे दडपण झुगारून रिंकूने त्याच्या नैसर्गिक फटकेबाजीने दहा-बारा चेंडू जरी खेळला तरी संघासाठी उपयुक्त 25 - 30 धावा वाढू शकतात.

पाकिस्तान संघ गेले दोन आठवडे आपण खेळायचे का नाही या संदिग्ध अवस्थेत होता. जेव्हा त्यांच्या बोर्डाने यू टर्न घेतला तेव्हा जरी ते अधिकृतपणे या सामन्याच्या तयारीला लागले असले तरी कर्णधार सलमान आगाने आम्ही आधीपासूनच तयार होतो, हे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. एका द़ृष्टीने पाकिस्तानी संघालाही आपले बोर्ड आणि सरकार माघार घेणार हे माहीत असल्याची कबुलीच त्याने दिली. पाकिस्तान पहिल्या नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात थोडक्यात बचावानतर यूएसए विरुद्ध सहज जिंकून या सामन्याला सामोरे जात आहेत. पाकिस्तान त्यांचे सर्व सामने कोलंबोतच खेळले असले तरी भारत आणि कोलंबो हे अंतर, वातावरण आणि खेळपट्ट्या बघता या कोलंबोच्या परिचित वातावरणाचा त्यांना भारतापेक्षा अधिक फायदा आहे, असे मुळीच नाही. पाकिस्तानची फलंदाजीची मदार साहिबजादा फरहान आणि सईम अयुब या सलामीच्या जोडीवरच आहे. या विश्वचषकाच्या आधी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेत कर्णधार सलमान आगा आणि अनुभवी बाबर आझम एखाद दुसरा डाव सोडला तर विशेष प्रभाव पडू शकले नाहीत. भारताच्या मधल्या फळीशी तुलना केली तर त्यांच्याकडेही अष्टपैलू शादाब, फईम अश्रफ आणि मोहम्मद नवाझ आहेत. पाकिस्तानी फलंदाजांची पूर्वीची कामगिरी बघता या खेळपट्टीवर बुमराह, वरुण चक्रवर्ती ही आपली अस्त्रे असतीलच, पण कुलदीप यादवची तितकीच गरज आहे.

पाकिस्तानच्या उस्मान तारीकच्या गोलंदाजीच्या अक्षांबद्दल खूप चर्चा झाली आहे. तो चेंडू सोडायला जितका थांबतो ते आयसीसीच्या नियमात बसणारे असले तर त्या अ‍ॅक्शनला महत्त्व देण्यापेक्षा त्यांनतर येणार्‍या चेंडूचा विचार केला पाहिजे. त्याच्या गोलंदाजीत विशेष असे काहीच नाही. त्याच्या अ‍ॅक्शनशी जुळवून घेतले तर आपल्या फलंदाजांनी त्याला कसे फटकावता येईल याचा सखोल अभ्यास अर्थातच केला असेल. कुठच्याही विश्वचषकात जोपर्यंत भारत-पाकिस्तान सामना होत नाही तोपर्यंत त्या स्पर्धेला रंग भरत नाही. पाकिस्तानच्या राजकीय खेळखंडोबानंतर आता पावसाचा अडथळा न येता महाशिवरात्रीला हा महामुकाबला निर्विघ्न होऊ दे इतकीच आता सामान्य प्रेक्षकांपासून मीडिया कंपन्यांपर्यंत सर्वांची त्या महादेवाकडे अपेक्षा आहे. भारताचे पारडे नक्कीच जड आहे, पण विजयाचे दान जोपर्यंत पदरात पडत नाही तोपर्यंत एक अनामिक हुरहुर तमाम भारतीय प्रेक्षकांच्या मनात असेलच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT