पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आज भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने आहेत. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले आहे. आजचा सामना भारताने जिंकला तर ट्रॉफीतील सेमी फायनलचे तिकिट निश्चित होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम-उल-हकने पाकिस्तान संघ कमकुवत असल्यचे म्हटले आहे. तसेच चार भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुकही केले आहे.
भारत आणि पाकिस्तान बहुचर्चित सामन्यापूर्वी आयोजित चर्चेत शाहिद आफ्रिदी, युवराज सिंग, इंझमाम-उल-हक आणि नवजोत सिंग सिद्धू सारखे दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी इंझमाम म्हणाला, 'भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नेहमीच दबाव असतो. जेव्हा तुम्ही वर्षातून फक्त एकच सामना खेळता तेव्हा दबाव वाढतो. आजकाल, जेव्हा इतके सामने प्रसारित होतात, तेव्हा खेळाडू एकमेकांना जवळून पाहतात. पूर्वी आपण तो एक सांघिक खेळ म्हणून पाहायचो. ज्या संघात चांगले संतुलन असेल, तो संघच वरचढ ठरेल. पण टी२० क्रिकेटच्या उत्क्रांतीसह, खेळ वैयक्तिक प्रतिभेकडे वळला आहे. एकटा खेळाडू सामन्याचा मार्ग बदलू शकतो. गेल्या काही वर्षांत भारताचा संघ मजबूत आहे. विशेषतः रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्यासारखे अष्टपैलू खेळाडू संघातचे संतुलन कायम ठेवतात. अशा खेळाडूंमुळे खूप फरक पडतो., ज्या संघाचे संतुलन चांगले असेल तो संघ बाजी मारेल, असे भाकितही त्याने केले.
'सर्व भारतीय खेळाडू खूप चांगले आहेत यात काही शंका नाही; पण विराट आणि रोहित हे मागील सुमारे २० वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. संघावर त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. जर ते लवकर बाद झाले तर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये लक्षणीय बदल होईल. पाकिस्तानचे मनोबल वाढेल. याचा अर्थ असा नाही की उर्वरित भारतीय खेळाडू कामगिरी करणार नाहीत. भारतातील सर्व खेळाडू खूप प्रतिभावान आहेत, पण तरीही रोहित आणि विराट हे भारतीय संघाचा कणा आहेत. पाकिस्तानकडून बाबर आझम लवकर बाद होतो पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये दबाव जाणवतो, त्याचप्रमाणे हे घडते. पाकिस्तानला जिंकण्यासाठी, खालच्या आणि मधल्या फळीला पुढे यावे लागेल. भारताने रोहित आणि विराट दोघांचेही बळी लवकर गमावले तर पाकिस्तानला फायदा होऊ शकतो, असेही इंझमाम-उल-हकने म्हटलं आहे.