नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने टेरिटोरियल आर्मी (प्रदेशिक सेना) सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत. अलीकडेच सरकारने एक अधिसूचना जारी केली असून, त्यात भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना टेरिटोरियल आर्मी नियम 1948 मधील नियम 33 अंतर्गत अधिकार देण्यात आले आहेत.
या अधिकारानुसार, लष्करप्रमुख टेरिटोरियल आर्मीतील कोणताही अधिकारी किंवा जवान यांना गरजेनुसार नियमित लष्कराच्या मदतीसाठी बोलावू शकतात. यामध्ये क्रिकेटपटू एमएस धोनी सारख्या दिग्गजाचा समावेश आहे.
धोनीला 1 नोव्हेंबर 2011 रोजी टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटच्या 106 पॅरा टीए बटालियनमध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पद पदवी प्रदान करण्यात आली.
2015 मध्ये, धोनीने आग्रा येथील प्रशिक्षण शिबिरात भारतीय लष्कराच्या विमानातून पाच पॅराशूट उड्या पूर्ण करून प्रशिक्षित पॅराट्रूपर म्हणून पात्रता मिळवली.
2019 मध्ये, धोनीने वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर पडत 31 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान 106 पॅरा टीए बटालियनसोबत जम्मू-काश्मीरमध्ये गस्त, सुरक्षा आणि पोस्ट ड्युटी पार पाडल्या. या काळात त्याने जवानांसोबत राहून त्यांच्या कर्तव्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
एमएस धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. सध्या तो आयपीएलमध्ये त्याच्या CSK संघाकडून खेळत आहे. पण आता तणावामुळे आयपीएल देखील स्थगित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, सर्व खेळाडू हळूहळू आपापल्या घरी परतत आहेत. अशा परिस्थितीत धोनी सैन्यात सेवा देऊ शकतो.
तज्ञांचे म्हणणे आहे की, ‘सैन्यातील मानद पद धारक व्यक्ती सहसा युद्ध परिस्थितीत सक्रिय लष्करी कर्तव्य बजावण्यास बांधील नसते. टेरिटोरियल आर्मीमध्ये धोनीसारख्या व्यक्तींची भूमिका प्रतीकात्मक आणि प्रेरणादायी आहे. तथापि, आपत्कालीन परिस्थितीत टेरिटोरियल आर्मीला सपोर्ट ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट किंवा इतर गैर-लढाऊ भूमिकांसाठी तैनात केले जाऊ शकते. धोनीसारखे लोक त्यांच्या लोकप्रियतेमुळे लष्कराचे मनोबल वाढवण्यात आणि जागरूकता पसरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, पण त्यांच्या थेट तैनातीची शक्यता नगण्य आहे,’ असे एका सूत्राने सांगितले.
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सध्या अस्तित्वात असलेल्या 32 टेरिटोरियल आर्मी इन्फंट्री बटालियनपैकी 14 बटालियन देशातील विविध लष्करी कमांडमध्ये तैनात केल्या जाणार आहेत. यामध्ये साउदर्न कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, सेंट्रल कमांड, नॉर्दर्न कमांड, साउथ-वेस्टर्न कमांड, अंडमान आणि निकोबार कमांड तसेच आर्मी ट्रेनिंग कमांड (ARTRAC) यांचा समावेश आहे.
सरकारी निवेदनात म्हटले आहे, ‘प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक नामांकित जवानास आवश्यकतेनुसार गार्ड ड्यूटीसाठी किंवा नियमित सैन्याला पाठबळ देण्यासाठी सक्रिय केले जाऊ शकते.’
टेरिटोरियल आर्मीची तैनाती केवळ त्याच वेळी केली जाईल, जेव्हा त्यासाठी आवश्यक निधी बजेटमध्ये उपलब्ध असेल किंवा अंतर्गत बचतीतून तो पुन्हा वाटप करण्यात आलेला असेल. जर टेरिटोरियल आर्मीची युनिट इतर कोणत्या मंत्रालयाच्या विनंतीवर तैनात केली गेली, तर त्याचा खर्च संबंधित मंत्रालयाच्या बजेटमधून केला जाईल, संरक्षण मंत्रालयाच्या बजेटमधून नाही.
टेरिटोरियल आर्मी ही लष्कराचा एक भाग आहे. जिथे लष्कराला गरज असते तिथे टेरिटोरियल आर्मी आपल्या तुकड्या पुरवते आणि नियमित सैन्याला मदत करते. या सैन्याची खास गोष्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला सैन्यात काम करण्याचे स्वप्न असेल पण तो दुसरे काही काम करत असेल तर तो एकाच वेळी ही दोन्ही कर्तव्ये पार पाडू शकतो.
18 ते 42 वयोगटातील जे पदवीधर आहेत आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत ते टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून सामील होऊ शकतात. यामध्ये सामील होण्याची अट अशी आहे की तुमचे स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत असले पाहिजे. ही एक स्वयंसेवा आहे, ती कायमची नोकरी नाही. तुम्हाला आवश्यक असेल तोपर्यंत सेवा देण्यास सांगितले जाऊ शकते, याचा अर्थ असा नाही की तुम्ही निवृत्त होईपर्यंत नोकरीत राहाल.