team india new test captain and squad selection for england test series
मुंबई : भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या मालिकेसह, भारतीय संघ नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चक्राची सुरुवात करेल. मात्र, या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर त्याच्यानंतर विराट कोहलीनेही निवृत्तीचे संकेत दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ विराट कोहलीशी निवृत्तीबद्दल चर्चा करू शकते. यानंतर 23 मे रोजी एक बैठक होईल. यामध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होऊ शकते. बैठकीनंतर बीसीसीआय पत्रकार परिषद घेईल. यामध्ये नवीन कसोटी कर्णधाराचे नाव जाहीर केले जाऊ शकते. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ संघाची निवड पुढील काही दिवसांत होण्याची अपेक्षा आहे.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर आता कसोटी क्रिकेटचा नवीन कर्णधार कोण असेल? या चर्चांना उधाण आले आहे. त्याच्या पाठोपाठच विराट कोहली सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. याबाबत त्याने बीसीसीआयला कळवल्याचे समोर आले आहे, परंतु बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून त्याला या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता कसोटी क्रिकेट मधील नवा कर्णधार कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर, पुढील काही काळासाठी भारतीय कसोटी संघात विराट कोहलीसारखा अनुभवी खेळाडू असणे महत्त्वाचे आहे. भारतासाठी सर्वाधिक कसोटी खेळलेल्या खेळाडूंच्या यादीत कोहली 7 व्या क्रमांकावर आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 210 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने आणि 55.57 च्या स्ट्राईक रेटने 9230 धावा केल्या आहेत. किंग कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद 254 धावा आहे. कसोटीत सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट चौथ्या क्रमांकावर आहे. तो या फॉरमॅटमध्ये 10,000 धावांपासून 770 धावा दूर आहे.