India 2036 Olympics | भारत २०३६ च्‍या ऑलिम्‍पिक यजमानपदासाठी प्रयत्‍नशील : पंतप्रधान नरेंद्र मोदी 
स्पोर्ट्स

India 2036 Olympics | भारत २०३६ च्‍या ऑलिम्‍पिक यजमानपदासाठी प्रयत्‍नशील : पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑस्‍ट्रेलिया दौर्‍यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला दिली भेट; चेन्नईतील ‘बीबीएल’ सामन्याचेही केले स्वागत

पुढारी वृत्तसेवा

मेलबर्न; वृत्तसंस्‍था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तीनदिवसीय ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) स्टेडियमला भेट दिली. यावेळी त्यांनी भारत २०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले, तसेच बिग बॅश लीग (बीबीएल) २०२६-२७ हंगामाचा उद्‌घाटनाचा सामना चेन्नईत होणार असल्‍याबद्दल आनंदही व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बेनिझ यांनी जाहीर केले की, 'बीबीएल २०२६-२७' हंगामाची सुरुवात भारतात होणार असून, चेन्नईचे एम. ए. चिदंबरम स्टेडियम डिसेंबरमध्ये या उद्घाटनाच्या सामन्याचे यजमानपद भूषवेल. दोन्ही पंतप्रधानांनी एका संयुक्त निवेदनात ही घोषणा केली. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले की, १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक सामन्यात 'मेलबर्न रेनेगेड्स' आणि 'पर्थ स्कॉर्चर्स' हे संघ आमनेसामने असतील. ऑस्ट्रेलियाबाहेर खेळवला जाणारा हा पहिलाच बिग बॅश लीग सामना ठरेल.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी सज्ज असून, त्याचसोबत २०३६ च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठीही दावा करत आहे. चेन्नईत होणाऱ्या बिग बॅश लीगच्या सामन्याचे स्वागत करताना ते म्हणाले की, भारतात क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यास त्याला प्रचंड प्रेक्षकवर्ग मिळतो. भारत २०३० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणार आहे. तसेच आम्ही २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या जागतिक स्पर्धांसाठी भारतात मोठ्या प्रमाणावर क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल. भारतातील चेन्नई येथे बिग बॅश लीगचा सामना होणार असल्याचा मला आनंद आहे. कोणत्याही खेळासाठी भारतात स्पर्धा आयोजित करणे म्हणजे अफाट प्रेक्षकसंख्या आणि लोकप्रियतेची हमी असणे आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

अल्बेनिझ म्हणाले की, आगामी दशक भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी क्रीडा संबंध मजबूत करण्याची मोठी संधी आहे. भारत २०३० च्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करत आहे, ऑस्ट्रेलिया २०३२ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणार आहे आणि भारत २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी दावेदारी करत आहे, त्‍याला ऑस्ट्रेलिया नक्कीच पाठिंबा देईल. आपल्यासमोर मैत्रीपूर्ण स्पर्धा आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी पुढचे संपूर्ण दशक उपलब्ध आहे," असे अल्बेनिझ म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी स्‍टीव्‍ह वॉ यांना दिली अनोखी भेट

या भेटीचे मुख्य आकर्षण म्हणजे पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज कर्णधार स्टीव्ह वॉ यांची भेट घेऊन त्यांना सुमारे २० वर्षे जुना एक दुर्मिळ फ्रेम केलेला फोटो भेट दिला. हा फोटो त्यावेळी काढण्यात आला होता, तेव्‍हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि स्टीव्ह वॉ यांनी त्यांची भेट घेतली होती. ही जुनी आठवण पाहून स्टीव्ह वॉ यांनीही आनंद व्यक्त केला. यावेळी ऑस्‍ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटपटू लिसा स्‍थळेकरही उपस्‍थित होती.

‘क्रीडा सहकार्य रोडमॅप’चे अनावरण

विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी आणि अल्बेनिझ यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील 'शेन वॉर्न स्टँड'ला देखील भेट दिली. दोन्ही देशांमधील क्रीडा संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी 'क्रीडा सहकार्य रोडमॅप'चे अनावरण केले. या उपक्रमांतर्गत मोठ्या जागतिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा ऑस्ट्रेलियाचा अनुभव आणि भारताची या क्षेत्रातील वाढती महत्त्वाकांक्षा एकत्र येणार असून यामुळे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीचे नवीन मार्ग खुले होतील. यात क्रीडा विज्ञान, तंत्रज्ञान संशोधन आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी विश्वास व्यक्त केला की, या रोडमॅपमुळे दोन्ही देशांमधील सहकार्य केवळ क्रिकेटपुरते मर्यादित न राहता इतर खेळांमध्येही प्रशिक्षक आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर पुढे जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT