स्पोर्ट्स

Lalit Upadhyay Retirement : भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या हॉकीपटूची तडकाफडकी निवृत्ती

ललित उपाध्याय हा पॅरिस ऑलिम्पिक 2024 आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदके जिंकणा-या भारतीय हॉकी संघाचा अविभाज्य घटक होता.

रणजित गायकवाड

india hockey team player and olympic medallist lalit upadhyay retirement भारतीय हॉकी संघाचा अनुभवी फॉरवर्ड आणि दोन ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू ललित उपाध्याय यांने आपल्या दोन दशकांहून अधिक यशस्वी कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या या अनपेक्षित निवृत्तीच्या घोषणेने क्रीडाविश्वात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ललितने 2014 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केले होते आणि दोन ऑलिम्पिक पदके जिंकणे ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी ठरली.

कारकिर्दीचा भावनिक समारोप

ललित उपाध्यायने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत आपल्या निवृत्तीची माहिती दिली. त्याने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, ‘हा प्रवास मर्यादित संसाधने असलेल्या एका लहानशा गावातून सुरू झाला, पण माझी स्वप्ने अमर्याद होती. अनेक आव्हानांचा सामना करण्यापासून ते दोनदा ऑलिम्पिक पदकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास अविस्मरणीय आणि गौरवाने भरलेला आहे. तब्बल 26 वर्षांनंतर आपल्या शहरातून पहिला ऑलिम्पियन बनण्याचा मान मी आयुष्यभर अभिमानाने जपेन.’

आकडेवारी आणि योगदान

ललित उपाध्यायने आपल्या शानदार खेळाच्या जोरावर भारतीय हॉकी संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. त्याच्याकडे गोल करण्याची एक अद्भुत क्षमता होती. वरिष्ठ स्तरावर खेळताना त्याने भारतीय संघासाठी 183 सामन्यांमध्ये 67 गोल नोंदवले. या 31 वर्षीय खेळाडूने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 15 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

पुरस्कार आणि सन्मान

ऑलिम्पिक पदकांव्यतिरिक्त, ललितने 2016 मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2017 मध्ये आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय संघात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याशिवाय, त्याने 2017 हॉकी वर्ल्ड लीग फायनल्समध्ये कांस्य, 2018 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रौप्य, 2018 आशियाई खेळांमध्ये कांस्य आणि 2018 आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक जिंकले. तो एफआयएच प्रो लीग 2021-22 मध्ये तिसऱ्या स्थानी राहिलेल्या आणि 2022 आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचाही भाग होते. भारतीय हॉकीमधील अतुलनीय योगदानाबद्दल ललितला 2021 मध्ये प्रतिष्ठित ‘अर्जुन पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT