ग्वांग्झू-द. कोरिया; वृत्तसंस्था : भारतीय पुरुष कम्पाऊंड तिरंदाजी संघाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. रविवारी रंगलेल्या अंतिम लढतीत भारतीय संघाने फ्रान्सला 235-233 अशा अतिशय निसटत्या फरकाने मात दिली. या ऐतिहासिक विजयामुळे कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये भारताचे वाढते वर्चस्व सिद्ध झाले आहे. दुसरीकडे, भारतीय महिला संघाला आठ वर्षांत पहिल्यांदाच पदक मिळवण्यात अपयश आले.
निर्णायक अंतिम लढतीत फ्रान्सवर निसटती मात
ऋषभ यादव, अमन सैनी आणि प्रथमेश फुगे यांचे सुयश
भारतीय महिला संघाला मात्र 8 वर्षांनंतर प्रथमच पदक मिळवण्यात अपयश
अंतिम सामन्यात ऋषभ यादव, अमन सैनी आणि प्रथमेश फुगे या पुरुष त्रिकुटाने दडपणाखालीही संयम राखत 57-59 अशा पिछाडीवरून जोरदार पुनरागमन केले. दुसर्या ‘एंड’मध्ये त्यांनी सहा अचूक ‘10’चा वेध घेत 117 -117 अशी बरोबरी साधली. तिसर्या ‘एंड’नंतर 176-176 अशी बरोबरी कायम होती. निर्णायक क्षणी भारताने आपली पकड कायम ठेवली, तर फ्रान्सच्या खेळाडूंनी दोन वेळा ‘9’चा वेध घेतला आणि त्यांची पकड ढिली झाली. त्यानंतर, भारताचा सर्वात कमी मानांकन असलेला खेळाडू फुगे याने आपल्या शेवटच्या प्रयत्नात अचूक ‘10’चा वेध घेत भारताच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
23 वर्षीय ऋषभ यादवसाठी हे सुवर्णपदक एका शानदार कामगिरीचे द्योतक ठरले. यापूर्वी, त्याने अनुभवी ज्योती सुरेखा वेन्नमसोबत मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले होते. ज्येष्ठ तिरंदाज अभिषेक वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा ऋषभ यादव भारताच्या उदयोन्मुख तार्यांपैकी एक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला शांघायमध्ये आपले पहिले विश्वचषक पदक जिंकल्यानंतर, आता त्याने एकाच स्पर्धेत दोन जागतिक अजिंक्यपद पदके मिळवली आहेत आणि त्याला वैयक्तिक प्रकारातही अधिक पदकांची आशा आहे. मात्र, महिला कम्पाऊंड संघासाठी निराशाजनक कामगिरी झाली. इटलीविरुद्ध 229-233 अशा पराभवानंतर त्यांचा प्रवास उप-उपांत्यपूर्व फेरीतच संपला. यामुळे 2017 पासून सुरू असलेली सलग 4 पदकांची मालिका खंडित झाली.