World Yoga Competition | भारताचे सुवर्णपदकांचे शतक 
स्पोर्ट्स

World Yoga Competition | भारताचे सुवर्णपदकांचे शतक

भारतीय शिलेदारांनी पटकावले ऐतिहासिक अव्वल स्थान!

पुढारी वृत्तसेवा

अहमदाबाद; वृत्तसंस्‍था : यजमान भारताने पहिल्यावहिल्या ‘जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा २०२६’मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेवर आपले एकछत्री साम्राज्य निर्माण केले आहे. अहमदाबाद येथील ‘एका एरिना’ मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने तब्बल १०२ सुवर्णपदकांसह एकूण ११४ पदकांची कमाई करत पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

४ ते ८ जूनदरम्यान रंगलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगभरातील ७९ देशांतील ५२२ खेळाडूंनी भाग घेतला होता. या जागतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या ३१ देशांना किमान एक पदक मिळवता आले, तर केवळ १० देशांना सुवर्णपदकाचे खाते उघडता आले. या तगड्या स्पर्धेत भारताने १२२ सदस्यीय बलाढ्य संघ मैदानात उतरवला होता. सबज्युनिअर (१०-१४ वर्षे) ते सीनिअर-सी (४५-५५ वर्षे) अशा एकूण ६ वयोगटांत भारतीय खेळाडूंनी हे सुवर्ण यश खेचून आणले.

जपान दुसऱ्या, तर अर्जेंटिना तिसऱ्या स्थानावर

पदकतालिकेत ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ५ कांस्यपदकांसह जपानने दुसरे स्थान मिळवले. अर्जेंटिनाने तिसरे स्थान पटकावले, ज्यामध्ये त्यांच्या नबिला बाराझा हिचा मोलाचा वाटा राहिला. नबिलाने वैयक्तिक २ सुवर्ण आणि ३ रौप्यपदके जिंकून स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू होण्याचा बहुमान मिळवला.

देशी खेळाला जागतिक ओळख

‘योगासन भारत’, ‘वर्ल्ड योगासन’ आणि ‘भारतीय ऑलिम्पिक संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा या खेळासाठी या क्षेत्रातील माईलस्‍टोन ठरली आहे. पारंपरिक योगासन, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर, आर्टिस्टिक ग्रुप आणि रिदमिक पेअर अशा विविध प्रकरांमध्ये ही स्पर्धा पार पडली. ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०२१’ आणि उत्तराखंडमधील ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२५’ नंतर आता या देशी खेळाने जागतिक स्तरावर आपली ताकद दाखवून दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT