पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा २-१ असा धुव्वा उडवला. भारतासाठी हरमनप्रीत सिंगने दोन गोल केले, तर नदीम अहमदने पाकिस्तानसाठी सामन्यात पहिला गोल केला. भारताने या स्पर्धेत सलग पाचवा सामना जिंकला आहे. पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताने याआधी चीनचा ३-०, जपानचा ५-१, मलेशियाचा ८-१ तर कोरियाचा ३-१ असा पराभव केला आहे.
आज (दि.१४) चीनमधील हुलुनबीर येथे हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघ एकमेकांशी भिडले. या सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानच्या नदीम अहमदने ८ व्या मिनिटाला केला. या स्पर्धेत भारताने प्रथमच एक गोल राखून सामन्याची सुरुवात केली. याआधी टीम इंडियाने गेल्या चार सामन्यांमध्ये पहिला गोल केला होता. मात्र, पहिल्या क्वार्टरअखेर भारताने पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने बरोबरी साधत हरमनप्रीत सिंगने भारताचे खाते उघडले. दुसऱ्या क्वार्टरच्या चौथ्या मिनिटाला हरमनप्रीतने दुसरा गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत पाकिस्तानने गोल करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या बचावफळीमुळे त्यांना अपयश आले. त्यामुळे ३० मिनिटांअखेर भारताने २-१ अशी आपली आघाडी कायम राखली.
तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघानी गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र यश मिळू शकले नाही. अनेक पेनल्टी कॉर्नर घेऊनही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. वाहिद अश्रफ राणाला पिवळे कार्ड मिळाल्याने तो १० मिनिटे बाहेर गेला. त्यामुळे सामन्याच्या शेवटच्या १० मिनिटांत पाकिस्तानचा संघ केवळ १० खेळाडूंसह खेळला. सामन्यावर अखेरपर्यंत भारतीय संघाने वर्चस्व कायम राखत पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला.