इपोह; वृत्तसंस्था : जुगराज सिंगने 4 गोल केल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने सुलतान अझलन शाह चषकात कॅनडावर 14-3 गोलने दणदणीत विजय मिळवला. सर्वाधिक गोल झालेल्या या सामन्यात भारताने ‘पूल’मधील अव्वल स्थान पटकावत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. या स्पर्धेत बेल्जियमकडून केवळ एका गोलने पराभूत झालेल्या भारताने, मागील सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 3-2 असा सनसनाटी विजय मिळवल्यामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावला होता. आता अंतिम विजेतेपदासाठी भारतीय संघ रविवारी पुन्हा एकदा बेल्जियमविरुद्धच उभा ठाकणार आहे.
सामन्याची सुरुवात चौथ्या मिनिटाला नीळकंठ शर्माने केलेल्या पहिल्या गोलने झाली. उत्तम बहरातील राजिंदर सिंगने 10 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. 11 व्या मिनिटाला ब्रेंडन गुरेलियुकने पेनल्टी कॉर्नरवर गोल केल्यानंतर कॅनडाने तत्काळ प्रत्युत्तर दिले. मात्र, यानंतर जुगराज सिंग आणि अमित रोहिदास यांनी अनुक्रमे 12 व्या आणि 15 व्या मिनिटाला गोल केले. यामुळे दुसर्या क्वार्टरमध्ये प्रवेश करताना भारताकडे 4-1 अशी भक्कम आघाडी होती.
गोलचा हा सिलसिला दुसर्या क्वार्टरमध्येही सुरूच राहिला. राजिंदर सिंगने 24 व्या मिनिटाला, दिलप्रीत सिंगने 25 व्या मिनिटाला आणि जुगराजने 26 व्या मिनिटाला आपला दुसरा गोल नोंदवला. या क्वार्टरच्या अखेरीस भारताने 7-1 अशी मोठी आघाडी घेतली होती. तिसर्या क्वार्टरमध्ये कॅनडाने 35 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकचे मॅथ्यू सारमेंटोने गोलमध्ये रूपांतरित करून स्कोअर 7-2 केला. जुगराज सिंगने 39 व्या मिनिटाला हॅट्ट्रिक पूर्ण केली, तर सेल्वम कार्थीने 43 व्या मिनिटाला गोल करत आघाडी 9-2 पर्यंत वाढवली.
अंतिम क्वार्टरमध्ये दोन्ही संघांकडून आणखी 6 गोल झाले. 46 व्या मिनिटाला अमित रोहिदासने तर 50 व्या मिनिटाला जुगराजने पेनल्टी स्ट्रोकचे रूपांतर गोलमध्ये केले. ज्योत्स्वरूप सिद्धूने कॅनडासाठी तिसरा गोल केला. 56 व्या मिनिटाला संजयने पेनल्टी स्ट्रोकवर आणखी एक गोल जोडला, तर अभिषेकने 57 व्या आणि 59 व्या मिनिटाला दोन गोल करत भारताच्या 14-3 गोलच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.