स्पोर्ट्स

India Archery World Cup Gold Medal : भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! थरारक शूट-ऑफमध्ये चीनचा पराभव

तीन वर्षांनंतर सुवर्ण भरारी

पुढारी वृत्तसेवा

शांघाय : भारतीय महिला रिकर्व संघाने तीरंदाजी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात यजमान आणि बलाढ्य चीनला धूळ चारत ऐतिहासिक सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कुमकुम मोहोद या त्रयीने अटीतटीच्या सामन्यात कमालीचा संयम दाखवत शूट-ऑफमध्ये विजय संपादन केला. विशेष म्हणजे, २०१० पासून आतापर्यंत सात विश्वचषक सुवर्णपदके नावावर असणाऱ्या अनुभवी दीपिका कुमारीच्या नेतृत्वाखाली भारताने २०२१ नंतर प्रथमच हे यश मिळवले आहे.

अटीतटीचा अंतिम सामना

रविवारी झालेल्या या थरारक अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आणि पहिला सेट ५४-५३ ने खिशात घातला. मात्र, यजमान चीनने कडवी झुंज देत दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये वर्चस्व गाजवले. यासह त्यांनी सामन्यात ४-२ अशी आघाडी घेतली. चौथा सेट निर्णायक वळणावर असताना, चीनला विजयासाठी शेवटच्या बाणात ९ गुणांची आवश्यकता होती, परंतु चिनी खेळाडू केवळ ८ गुण मिळवू शकले. परिणामी, भारताने हा सेट जिंकून सामना ४-४ अशा बरोबरीत आणला आणि निकाल 'शूट-ऑफ'वर गेला.

दीपिकाचा अनुभव आणि सुवर्णवेध

शूट-ऑफच्या अत्यंत दडपणाखालील क्षणांमध्ये अंकिताने ९ आणि १७ वर्षीय कुमकुमने १० गुणांची कमाई केली. अखेरच्या बाणावर विजयासाठी ८ गुणांचा वेध घेणे गरजेचे असताना, चार वेळा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या दीपिका कुमारीने कमालीचे धैर्य दाखवले आणि ९ गुणांचा वेध घेतला. यासह भारतीय संघाने ५-४ (२८-२६) अशा फरकाने सुवर्णपदक पटकावले.

तीन वर्षांनंतर सुवर्ण भरारी

भारतीय महिला रिकर्व संघासाठी हे पदक अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण गेल्या तीन वर्षांतील हे त्यांचे पहिलेच विश्वचषक सुवर्णपदक आहे. या विजयापूर्वी भारतीय संघाने उपांत्य फेरीत १० वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाला पराभूत करून मोठा उलटफेर केला होता. पूर्णवेळ राष्ट्रीय प्रशिक्षक सोबत नसतानाही, दीपिकाने मैदानावर संघाचे नेतृत्व करत सहकाऱ्यांचे मनोबल उंचावले.

भारताची पदकतालिकेतील वाटचाल

शांघायमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. या सुवर्णपदकापूर्वी साहिल जाधवने कम्पाउंड प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. आता सर्वांच्या नजरा रिकर्व तीरंदाज सिमरनजीत कौरवर खिळल्या असून, ती उपांत्य फेरीत आपले पहिले वैयक्तिक पदक मिळवण्यासाठी सज्ज आहे.

उज्बेकिस्तान आणि व्हिएतनामवर मात

भारताच्या या विजयी मोहिमेची सुरुवात प्री-क्वार्टर फायनलपासून झाली. या सामन्यात भारतीय संघाने उज्बेकिस्तानचा ६-२ असा सहज पराभव करत आपली ताकद दाखवून दिली. त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये व्हिएतनामच्या संघाने भारताला कडवी झुंज दिली. हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला आणि अखेर 'शूट ऑफ'मध्ये भारतीय महिलांनी ५-४ ने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली.

दक्षिण कोरियाचा ऐतिहासिक पराभव

सेमीफायनलमध्ये भारतीय संघासमोर जागतिक तिरंदाजीतील 'महासत्ता' मानल्या जाणाऱ्या आणि टॉप सीडेड दक्षिण कोरियाचे कठीण आव्हान होते. रिकर्व तिरंदाजीमध्ये दक्षिण कोरियाला हरवणे हे कोणत्याही संघासाठी स्वप्नवत मानले जाते. मात्र, भारतीय तिरंदाजांनी कमालीचा संयम आणि अचूक नेमबाजीचे प्रदर्शन करत कोरियाचा ५-१ असा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यांनी जेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT