अहमदाबाद; वृत्तसंस्था : 2030 राष्ट्रकुल खेळांचे प्रस्तावित यजमान शहर म्हणून अहमदाबादची शिफारस कॉमनवेल्थ स्पोर्टस्च्या कार्यकारी मंडळाने बुधवारी केली आहे. यामुळे दोन दशकांनंतर हा मोठा क्रीडा सोहळा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तसेच 2036 मध्ये ऑलिम्पिक यजमान बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला बळ मिळाले आहे.
दोन दशकानंतर राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भारताकडे
2036 ऑलिम्पिक यजमानपदाच्या प्रस्तावालाही बळ
26 नोव्हेंबरला ग्लासगोतील बैठकीत अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होणार
शिक्कामोर्तब होणे ही आता केवळ औपचारिकता ठरणार
ही शिफारस आता कॉमनवेल्थ स्पोर्टच्या पूर्ण सदस्यत्वाकडे पाठवली जाईल आणि 26 नोव्हेंबर रोजी ग्लासगो येथे होणार्या संस्थेच्या जनरल असेंब्लीमध्ये यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. आता हा निर्णय केवळ औपचारिकता असल्याचे मानले जात आहे. भारताने यापूर्वी 2010 मध्ये नवी दिल्ली येथे पहिल्यांदा या खेळांचे आयोजन केले होते.
राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद मिळणे हा भारतासाठी एक महत्त्वाचा टप्पा असेल. भारताने 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद स्वीकारण्याचेही लक्ष्य ठेवले आहे. ते देखील अहमदाबादमध्येच प्रस्तावित आहे. 2030 च्या बोलीसाठी भारताला नायजेरियातील अबुजा शहराकडून स्पर्धा होती, पण, कॉमनवेल्थ स्पोर्टने आफ्रिकन राष्ट्राच्या यजमानपदाच्या महत्त्वाकांक्षेला भविष्यातील खेळांसाठी, ज्यात 2034 चा समावेश आहे, पाठिंबा देण्यासाठी एक धोरण विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॉमनवेल्थ स्पोर्टने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे : कॉमनवेल्थ स्पोर्टच्या कार्यकारी मंडळाने आज अहमदाबाद या शहराची 2030 च्या शताब्दी राष्ट्रकुल खेळांसाठी प्रस्तावित यजमान शहर म्हणून शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव आता कॉमनवेल्थ स्पोर्टच्या पूर्ण सदस्यत्वापुढे ठेवले जाईल आणि 26 नोव्हेंबर रोजी ग्लासगो येथे होणार्या कॉमनवेल्थ स्पोर्ट जनरल असेंब्लीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल. ही शिफारस कॉमनवेल्थ स्पोर्टच्या मूल्यांकन समितीने देखरेख केलेल्या प्रक्रियेनंतर करण्यात आली आहे. या समितीने तांत्रिक अंमलबजावणी, अॅथलीट अनुभव, पायाभूत सुविधा, प्रशासन आणि कॉमनवेल्थ स्पोर्ट मूल्यांशी सुसंगतता या आधारावर दावेदार शहरांचे मूल्यांकन केले होते.