काकामिगाहारा (जपान); वृत्तसंस्था : कर्णधार केतन कुशवाहाचे दोन शानदार गोल आणि बचावात्मक फळीच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने 18 वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियाचा 4-1 असा धुव्वा उडवला. पहिल्या आणि दुसर्या सत्रात प्रत्येकी दोन गोल डागत भारताने ‘पूल ए’मध्ये अव्वल स्थान काबीज केले आहे.
तिसर्या मिनिटाला राहुल यादवने दिलेल्या उत्कृष्ट पासवर कर्णधार केतन कुशवाहाने गोल करण्याचा प्रयत्न केला. कोरियाच्या गोलरक्षकाने पहिला प्रयत्न परतावून लावला, पण रिबाऊंडवर केतनने चपळाईने चेंडू जाळ्यात धाडून भारताचे खाते उघडले. या सुरुवातीच्या धक्क्यातून कोरिया सावरण्यापूर्वीच, 5 व्या मिनिटाला गाझी खानने दिलेल्या पासवर अनमार्क असलेल्या वरिंदर सिंगने दुसरा गोल करत भारताला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
दुसर्या सत्रात 21 व्या मिनिटाला कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. याचे त्यांचा कर्णधार युन जेह्युकने गोलमध्ये रूपांतर करून फरक 2-1 असा कमी केला. मात्र, मध्यंतरानंतर भारताने पुन्हा एकदा सामन्यावर नियंत्रण मिळवले. 36 व्या मिनिटाला केतन कुशवाहाने वैयक्तिक दुसरा गोल करून भारताला 3-1 ने पुढे नेले. पुढे शाहरूख अलीने एक वेगवान मैदानी गोल करत कोरियाच्या आशा संपुष्टात आणल्या आणि भारताचा 4-1 असा विजय निश्चित केला.
या विजयानंतर ‘पूल ए’ मध्ये भारत, दक्षिण कोरिया आणि जपान हे तिन्ही संघ प्रत्येकी 6 गुणांसह बरोबरीवर आहेत. भारतीय संघ बुधवारी (दि. 3) चायनीज तैपेईविरुद्ध आपला शेवटचा साखळी सामना खेळणार आहे.