IND beat SL in Super Over and win series 3-0
भारताने सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा पराभव केला. File Photo
स्पोर्ट्स

IND vs SL : भारताचा सुपर क्लीन स्विप

श्रीलंकेच्या तोंडातून हिसकावला विजयाचा घास

Arun Patil

दम्बुला : वृत्तसंस्था : प्रतिस्पर्ध्याच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेणे ही आता टीम इंडियाची सवय बनली आहे. वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची आठवण यावी असा सामना भारताने मंगळवारी जिंकला. अतिशय चुरशीने रंगलेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेला सुपरओव्हरमध्ये पराभूत केले. कर्णधार म्हणून सूर्यकुमारची तर प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच मालिका होती. 3 सामन्यांची ही मालिका भारताने 3-0 अशी आपल्या नावावर केली.

नाणेफेक हरल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना 137 धावा केल्य. या सामन्यात श्रीलंका संघ 2 बाद 117 असा विजयाच्या उंबरठ्यावर होता. पण हार न मानण्याची वृत्ती रक्तात भिनलेल्या भारतीय गोलंदाजांनी लंकन वाघाच्या तोेंंडातून विजयाचा घास अक्षरश: खेचून आणला. श्रीलंकेला 2 बाद 117 वरून 8 बाद 137 असे बरोबरीत रोखले. त्यामुळे सामना सुपरओव्हरमध्ये गेला. येथेही वॉशिंग्टन सुंदरने केवळ 2 धावांत श्रीलंकेचे दोन्ही फलंदाज बाद केल्यामुळे भारताला विजयासाठी फक्त 3 धावा करायच्या होत्या. शुभमन गिलने पहिल्याच चेंडूवर स्वीपला चौकार ठोकून भारताला विजयी केले.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. तिसरा सामना मंगळवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 137 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून पथूम निसंका आणि कुशल मेंडिस यांनीही संयमी सुरुवात संघाला देत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र ही भागीदारी 9 व्या षटकात रवी बिश्नोईने मोडली. त्याने निसंकाला 26 धावांवर बाद केले.

निसंका बाद झाल्यानंतरही कुशल मेंडिसला कुशल परेराने आक्रमक खेळत चांगली साथ दिली होती. त्यांनी श्रीलंकेला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. मात्र कुशल मेंडिसला रवी बिश्नोईने 16 व्या षटकात 43 धावांवर पायचीत करत माघारी धाडले. त्यानंतर पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने वनिंदू हसरंगा आणि श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका यांना बाद करत श्रीलंकेला मोठे धक्के दिले. त्यामुळे श्रीलंकेच्या 17 षटकात 4 बाद 117 धावा झाल्या. त्यांना 18 चेंडूत 21 धावांची गरज होती.

गोलंदाजीत सूर्यकुमारने धाडसी निर्णय घेत 19 वे षटक रिंकू सिंगला दिले तर 20 वे षटक स्वत: टाकले. रिंकू सिंगने 19 व्या षटकात आक्रमक खेळणार्‍या कुशल परेराला आपल्याच चेंडूवर झेल घेत माघारी धाडले. परेराने 34 चेंडूंत 46 धावा केल्या. याच षटकात रिंकूने रमेश मेंडिसलाही 3 धावावंर शुभमन गिलच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे अखेरच्या षटकात 6 चेंडूत 6 धावांची श्रीलंकेला गरज होती.

शेवटच्या षटकात कर्णधार सूर्यकुमार यादव गोलंदाजीला आला. त्याने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही, तर दुसर्‍या चेंडूवर कामिंदू मेंडिसला एक धावेवर बाद केले. रिंकूने थर्डमॅनला त्याचा झेल घेतला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर महिश तिक्षणाला सूर्यकुमारने बाद केले. त्यामुळे 3 चेंडूत 6 धावा असे समीकरण असताना पुढच्या तीन चेंडूंत 5 धावा निघाल्या आणि सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सामना सुपर ओव्हर वर गेला.

तत्पूर्वी, सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर तिसर्‍या ट्वेंटी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेने चांगली कामगिरी केली. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाला अवघ्या 137 धावांत रोखण्यात त्यांना यश आले. संजू सॅमसन दुसर्‍यांदा खाते न उघडता तंबूत परतला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत भारतीय फलंदाजांना कोंडीत पकडले. शुभमन गिल वगळता एकाही भारतीय शिलेदाराला मोठी खेळी करता आली नाही. त्याने 37 चेंडूत 39 धावांची संयमी खेळी केली. अखेर भारतीय संघ निर्धारित 20 षटकांत 9 बाद 137 धावा करू शकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.