U18 Hockey Asia Cup 2026 | थरारक लढतीत भारताचा पाकवर ५-३ गोलने विजय 
स्पोर्ट्स

U18 Hockey Asia Cup 2026 | थरारक लढतीत भारताचा पाकवर ५-३ गोलने विजय

१८ वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

काकामिगाहारा (जपान) : १८ वर्षांखालील आशिया चषक २०२६ हॉकी स्‍पर्धेत भारतीय संघाने शुक्रवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५-३ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. चौथ्या आणि अंतिम सत्रात भारतीय खेळाडूंनी केलेल्या नेत्रदीपक पुनरागमनाच्या जोरावर हा विजय साकारला. भारताचा स्टार खेळाडू आशिष ताणी पूर्ती या सामन्याचा खरा हिरो ठरला; त्याने एकट्याने तब्बल ४ गोल डागले.

सामन्याच्या १२ व्या मिनिटाला आशिषने पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, पाकिस्तानने जोरदार पुनरागमन करत मध्यांतरापर्यंत सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसऱ्या सत्रात भारताकडून शाहरूख अलीने (३५ वे मिनीट) गोल केला, पण पाकिस्तानच्या फरहान अस्लम आणि उझैर अहमद यांनी लागोपाठ दोन गोल करत पाकिस्तानला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.

तिसऱ्या सत्राअखेर २-३ अशा फरकाने मागे असलेल्या भारतीय संघाने चौथ्या सत्रात आक्रमणाचा धडाका लावला. ४६ व्या मिनिटाला पाकिस्तानच्या मुजम्मिल सईदला ग्रीन कार्ड मिळाल्याचा फायदा भारताला झाला. आशिषने ४९ व्या, ५३ व्या आणि ५६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर सलग तीन गोल करत आपली हॅट्‌ट्रिक पूर्ण केली आणि भारताला ५-३ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. आता भारताचा अंतिम सामना शनिवारी (६ जून) यजमान जपानविरुद्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT