अहमदाबाद; वृत्तसंस्था : न्यूझीलंड महिला संघ भारतीय महिला संघाविरुद्ध वन-डे मालिका खेळत असून, मालिकेतील पहिला सामना गुरुवारी खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिलांनी विश्वविजेत्या न्यूझीलंडवर 59 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 227 धावा केल्या आणि त्यानंतर न्यूझीलंडला 40.4 षटकांत 168 धावांत गुंडाळले.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताकडून तेजल हसबनीस आणि सायमा ठाकोर या दोघींचे पदार्पण झाले. स्मृती मानधनाकडून तेजलला, तर जेमिमा रोड्रिग्सकडून सायमाला पदार्पणाची कॅप देण्यात आली.
या सामन्यात हरमनप्रीत कौरला दुखापत असल्याने तिच्या अनुपस्थितीत स्मृती मानधनाने भारतीय संघाचे नेतृत्व केले. तिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचाही निर्णय घेतला. परंतु, भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताने 91 धावांवर 4 विकेटस् गमावल्या होत्या. परंतु, त्यावेळी जेमिमा आणि तेजलने भागीदारी केली. पहिल्याच सामन्यात खेळत असूनही तेजलने दडपण न येऊ देता शानदार खेळी केली. तिने भारताकडून डावातील सर्वोच्च 42 धावांची खेळी केली. जेमिमाने 35 धावा केल्या, तर नंतर आलेल्या दीप्ती शर्माने 41 धावा केलेल्या. त्यामुळे भारतीय महिला संघाला किमान 44.3 षटकांत सर्वबाद 227 धावा करता आल्या. त्यानंतर राधा यादवच्या 3 विकेटस् आणि दुसरी पदार्पण करणारी खेळाडू सायमा ठाकोरच्या 2 विकेटस्च्या जोरावर 40.4 षटकांत 168 धावांत गुंडाळले. त्यामुळे महिला संघाला 59 धावांनी विजय मिळाला. ब्रुक हालिडे हिने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली.
तेजलचा जन्म पुण्यात 16 ऑगस्ट 1997 रोजी झाला. ती गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. मधल्या फळीतील ती भरवशाची फलंदाज असून, तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र आणि वेस्ट झोनसाठी सातत्याने शानदार कामगिरी केली आहे.