राजगीर; वृत्तसंस्था : आशिया चषक हॉकी स्पर्धेतील यंदाच्या मोसमात विशेष बहरात असलेल्या भारतीय संघाने कोरियाचा तब्बल 4-1 अशा फरकाने पराभव करत, तब्बल 8 वर्षांनंतर प्रथमच या स्पर्धेच्या जेतेपदावर अगदी थाटात शिक्कामोर्तब केले. अगदी पहिल्या मिनिटापासून या लढतीत वर्चस्व गाजवणार्या भारतीय संघाचे या विजयामुळे 2026 च्या विश्वचषकातील स्थानही निश्चित झाले आहे.
राजगीर येथे झालेल्या या अंतिम सामन्यात दिलप्रीत सिंगने दोन गोल केले. सुखजीत सिंगने पहिल्याच मिनिटात गोल करून भारताच्या विजयाचा पाया रचला तर अंतिम क्षणी अमित रोहिदासने गोलजाळ्याचा अचूक वेध?घेतला. यापूर्वी, भारताने 2017 मध्ये ढाका येथे मलेशियाचा पराभव करून शेवटचे विजेतेपद पटकावले होते. या हंगामात यजमान भारताने एकही सामना न गमावता विजेतेपद मिळवले. तत्पूर्वी, तिसर्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात मलेशियाने चीनचा 4-1 ने पराभव केला, तर जपानने बांगला देशला हरवून पाचवे स्थान मिळवले.
आठव्या मिनिटाला दिलप्रीतला गोल करण्याची संधी मिळाली; पण किमने त्याचा प्रयत्न निष्फळ ठरवला. 44 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला; पण हरमनप्रीतचा शॉट कोरियन बचावपटूंनी अडवला. त्याच मिनिटाला भारताने तिसरा गोल केला. दिलप्रीतने उत्कृष्ट चालीचा उपयोग करत त्याचा दुसरा गोल केला.
50 व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि अमित रोहिदासने कोणताही चूक न करता गोल करत स्कोअर 4-0 केला. 51 व्या मिनिटाला कोरियाला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर सोन दैनने गोल करून स्कोअर 4-1 वर आणला. यानंतर कोरियाने जोरदार हल्ले केले; पण भारतीय बचाव भेदणे त्यांना कठीण गेले. भारताच्या बचावाने शेवटपर्यंत दिलेला कणखर प्रतिकार विजयासाठी पुरेसा ठरला.
सामन्याच्या सुरुवातीलाच, अवघ्या 30 सेकंदांत भारताने पहिला गोल करत शानदार सुरुवात केली. हा गोल पूर्णपणे हरमनप्रीतच्या कौशल्यामुळे झाला. त्याने कोरियाच्या मध्यरक्षक आणि बचावपटूंना चकवून सुखजीतला पास दिला. सुखजीतने जोरदार रिव्हर्स हिट मारून चेंडू गोलजाळीच्या वरच्या डाव्या कोपर्यात धाडला. पहिल्या गोलनंतर कोरियाने यजमान संघावर दबाव वाढवण्यास सुरुवात केली; परंतु भारताने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील चुकांमधून धडा घेतल्याचे दिसून आले.