भारत फायनलमध्ये; ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर pudhari photo
स्पोर्ट्स

भारत फायनलमध्ये; ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर

Champions Trophy 2025 : अहमदाबादचे उट्टे काढले; चेसमास्टर विराट कोहली विजयाचा शिल्पकार

पुढारी वृत्तसेवा

दुबई : वृत्तसंस्था

दुबईत रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 4 विकेटस्नी हरवून स्पर्धेबाहेर फेकले. या विजयाने भारताने 2023 च्या वर्ल्डकप अंतिम सामन्यातील पराभवाचे उट्टे काढले. स्पर्धेत जबरदस्त फार्मात असलेल्या टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 264 धावांत गुंडाळले. त्यानंतर रनमशिन, चेसमास्टर विराट कोहलीच्या 84 धावांच्या जोरावर हे लक्ष्य 11 चेंडू शिल्लक ठेवून गाठले. श्रेयस अय्यर (45), के. एल. राहुल (42), हार्दिक पंड्या (28) यांनी विजयात हातभार लावला. या विजयामुळे भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या फायनलमध्ये द.आफ्रिका किंवा न्यूझीलंड यांच्यापैकी एका संघाशी रविवारी भारताची दुबईच्या मैदानावर लढत होणार आहे.

भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली होती. रोहितने आक्रमक खेळ सुरुवातीचा केला होता, पण शुभमन गिल पाचव्या षटकात 8 धावांवर बेन ड्वारशुईच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याच्यापाठोपाठ 8 व्या षटकात रोहित शर्माही 29 चेंडूंत 28 धावा करून माघारी परतला. त्याला कुपर कोनोलीने पायचीत केले. यानंतर मात्र विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी एकेरी-दुहेरी धावांबरोबरच खराब चेंडूवर चेंडू सीमापार करताना धावफलक हलता राहील याची काळजी घेतली. या दोघांनी 91 धावांची भागीदारीही केली. यादरम्यान विराटने अर्धशतक पूर्ण केले.

पण 27 व्या षटकात श्रेयसला अ‍ॅडम झम्पाने त्रिफळाचीत करत भागीदारी तोडली. श्रेयस 62 चेंडूंत 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराटला काही वेळ अक्षर पटेलने साथ दिली, पण अक्षरला 35 व्या षटकात नॅथन एलिसने 27 धावांवर त्रिफळाचीत केले, पण तरी एक बाजू विराटने सांभाळली होती. त्याला के. एल. राहुल साथही देत होता. त्यामुळे विराट आणखी एक शतक करेल, असे दिसत होते; परंतु याचवेळी माशी शिंकली विराट 43 व्या षटकात झम्पाच्या गोलंदाजीवर बेन ड्वारशुईकडे झेल देत बाद झाला. विराटने 98 चेंडूंत 5 चौकारांसह 84 धावांची खेळी केली.

विराट बाद झाल्यानंतर के. एल. राहुलला हार्दिक पंड्याने साथ दिली होती; पण विजयासाठी 6 धावांची गरज असताना पंड्या 24 चेंडूंत 28 धावा करून बाद झाला. पण अखेर के. एल. राहुलने 49 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारत भारताचा विजय पक्का केला. के. एल. राहुलने 34 चेंडूंत नाबाद 42 धावा केल्या. रवींद्र जडेजा 2 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना अ‍ॅडम झम्पा आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. बेन ड्वारशुईस आणि कुपर कोनोली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर ट्रॅव्हिस हेड याने नवा पार्टनर कुपर कोनोली याच्यासोबत ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाची सुरुवात केली. मोहम्मद शमीने 9 चेंडूंचा सामना करणार्‍या कुपर कोनोली याला शून्यावर माघारी धाडले. ट्रॅव्हिस हेडही 39 धावा करून वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने लॅबुशेनसोबत तिसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. जड्डूने लॅबुशेनला 29 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या जोश इंग्लिसलाही जड्डूनेच तंबूत धाडले. मग कॅरी अन् स्मिथ जोडी जमली.

आधी लॅबुशेनसोबत अर्धशतकी भागीदारी केल्यावर पाचव्या विकेटसाठी स्मिथ आणि कॅरी जोडीने 54 धावांची भागीदारी रचली. स्मिथ शतकी खेळीकडे वाटचाल करत असताना शमीने 73 धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लावला. कॅरी शेवटपर्यंत आपला तोरा दाखवण्याच्या मूडमध्ये होता, पण श्रेयस अय्यरच्या जबरदस्त थ्रोवर त्याची खेळी 61 धावांवर थांबली. अन् अखेरच्या टप्प्यात ठराविक अंतराने पडलेल्या विकेटस्मुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 3 चेंडू शिल्लक असतानाच 264 धावांत ऑल आऊट झाला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेटस् घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2-2 विकेटस् आपल्या खात्यात जमा केल्या.या सामन्यात पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली म्हणून भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून उतरला होता.

विराटचे 161 झेल; रिकी पाँटिंगला टाकले मागे

टीम इंडियाच्या बॅटिंगची आस असणार्‍या विराट कोहलीने या सामन्यात रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहली मैदानात उतरला की, तो कोणता ना कोणता रेकॉर्ड करतोच. यावेळी बॅटिंगला येण्याआधी फिल्डिंग करताना त्याने ऑस्ट्रेलियन माजी कॅप्टनला धोबीपछाड दिली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली भारताकडून सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत त्याने 301 सामन्यांत 161 झेल टिपले आहेत. या मॅचमध्ये रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर जोश इंग्लिसचा झेल घेताच त्याने पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर नॅथन एलिसचा झेल पकडताच त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गजाला मागे टाकले. वन डेत सर्वाधिक झेल पकडणार्‍या खेळाडूंच्या यादीत आता तो पाँटिंगच्या पुढे निघून गेला आहे.

वन डे क्रिकेटमध्ये फिल्डरच्या रूपात सर्वाधिक झेल पकडण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड श्रीलंकेच्या माहेला जयवर्धने याच्या नावे आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 218 झेल टिपले आहेत. वन डेत 200 पेक्षा अधिक झेल घेणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्यानंतर आता या यादीत विराट कोहलीचा नंबर लागतो. कोहलीने 301 सामन्यांत 161 झेल टिपले आहेत. रिकी पाँटिंगच्या नावे 160 झेलचा रेकॉर्ड आहे. त्याच्या पाठोपाठ या यादीत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा नंबर लागतो. त्याने आपल्या वन डे कारकिर्दीत 156 झेल टिपले आहेत.

यजमान पाकिस्तान, फायनल मात्र दुबईत!

दुबईच्या मैदानात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर केले. त्यामुळेच हा विजय खूप मोठा आहे. याशिवाय भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल गाठल्यामुळे यजमान पाकिस्तानलाही ‘440 व्होल्टचा झटका’ बसला आहे. कारण आता यजमान पाकिस्तान असले तरी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनलही दुबईच्या मैदानातच खेळवली जाईल.

आपलाच विक्रम मोडला

आयसीसी वन डे स्पर्धांमध्ये बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला हा सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग आहे. भारताने आपलाच 2011 वर्ल्ड कपमधील विक्रम मागे टाकला आहे. याआधी 2011 वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने 261 धावांचे लक्ष्य पार केले होते.

भारत पाचव्यांदा अंतिम फेरीत

भारताने एकूण पाचव्यांदा, तर सलग तिसर्‍यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारतीय संघ आता तिसर्‍यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यास सज्ज आहे. यापूर्वी भारताने 2002 मध्ये श्रीलंकेसह संयुक्तरीत्या पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2013 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. 2017 मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यानंतर आता 12 वर्षांनी पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी भारताकडे आहे.

वन डेत सर्वाधिक झेल घेणारे क्रिकेटर

218- माहेला जयवर्धने

161- विराट कोहली

160- रिकी पाँटिंग

156 - मोहम्मद अझरुद्दीन

142 - रॉस टेलर

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : 49.3 षटकांत सर्वबाद 264 धावा. (स्टिव्ह स्मिथ 73, अ‍ॅलेक्स कॅरी 61, ट्रॅव्हिस हेड 39. मोहम्मद शमी 3/48, रवींद्र जडेजा 2/40, वरुण चक्रवर्ती 2/49.)

भारत : 48.1 षटकांत 6 बाद 267 धावा. (विराट कोहली 84, श्रेयस अय्यर 45, के. एल. राहुल नाबाद 43. अ‍ॅडम झम्पा 2/60, नॅथन इलिस 2/49.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT