मुल्लनपूर; वृत्तसंस्था : भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघात आज (रविवारी) येथे 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिली वन डे खेळवली जाणार असून एका अर्थाने ही दोन्ही संघांसाठी आगामी आयसीसी वर्ल्डकपची रंगीत तालीम ठरणार आहे. उभय संघांतील पहिली लढत येथे दुपारी 1.30 पासून खेळवली जाईल.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी ही मालिका मायदेशी होणार्या विश्वचषकापूर्वी संघाची रचना निश्चित करण्यासाठी सहायक ठरेलच. शिवाय, गतवर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या 0-3 च्या मानहानिकारक पराभवाचा बदला घेण्याची देखील ही नामी संधी असणार आहे. याचे कारण म्हणजे, त्या पराभवानंतर भारताने सातत्याने दर्जेदार खेळ साकारला आहे. स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे जवळपास नऊ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असणारी जलद गोलंदाज रेणुका सिंगचे या लढतीच्या माध्यमातून पुनरागमन होत आहे. रेणुकासह इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेत सर्वाधिक बळी घेणारी क्रांती गौड आणि अरुंधती रेड्डी यांच्यावर भारतीय जलद गोलंदाजीची भिस्त असेल.
फलंदाजीत, स्मृती मानधना शेफाली वर्माच्या जागी आपले स्थान निश्चित केलेल्या प्रतिका रावलसोबत सलामीला येईल. या मालिकेतील पहिले दोन सामने मुल्लनपूर येथे खेळले जातील, तर मालिकेतील निर्णायक सामना 20 रोजी नवी दिल्ली येथे होईल.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग, अरुंधती रेड्डी, रिचा घोष, क्रांती गौड, सायली सतघरे, राधा यादव, एन श्री चारणी, यास्तिका भाटिया, स्नेह राणा.
ऑस्ट्रेलिया : एलिसा हिली (कर्णधार), टाहिला मॅकग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राऊन, निकोल फाल्टम, अॅश्ले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, चार्ली नॉट, फोबी लिचफिल्ड, सोफी मोलिनक्स, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वोल, जॉर्जिया वेरेहम.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 पासून.