नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावरील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथे 17 डिसेंबरपासून खेळणार आहे. ही कसोटी डे-नाईट खेळविण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार अॅडलेडमध्ये गुलाबी चेंडूने सामना खेळल्यानंतर 'बॉक्सिंग डे' टेस्ट मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 26 डिसेंबरपासून सुरू होईल.
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन सामन्यांनंतर तिसर्या व चौथ्या कसोटीदरम्यान एक आठवड्याचा ब्रेक ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रस्ताव मान्य केला आहे. कारण, तिसरी कसोटी 7 जानेवारी 2021 पासून सिडनीत, तर शेवटची कसोटी ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून सुरू होईल.
असेही समजते, की कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन-डे व तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. वन-डे सामने 26, 28 आणि 30 नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनमध्ये,तर टी-20 सामने अॅडलेड येथे 4, 6 आणि 8 डिसेंबर रोजी खेळविले जाणार आहेत.
जगात हाहाकार उडवत असलेल्या कोरोनाचे संकट पाहता या दौर्यात कोरोनासंबंधीचे अत्यंत कडक नियम तयार केले जाणार आहेत. कोणत्याही खेळाडू, अथवा सपोर्ट स्टाफला बायो बबलला तोडण्याची परवानगी देण्यात येणार नाही, तसेच ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर टीम इंडिया व सपोर्ट स्टाफला क्वारंटाईन अवधी पूर्ण करावा लागणार आहे.