IND vs ENG 5th Test Day | भारताने चहापानाअखेर 6 बाद 304 धावांपर्यंत मजल Pudhari File Photo
स्पोर्ट्स

IND vs ENG 5th Test Day | भारताने चहापानाअखेर 6 बाद 304 धावांपर्यंत मजल

नाईट वॉचमन आकाश दीपचे तडफदार अर्धशतक : इंग्लंडसमोर विक्रमी धावांचे आव्हान ठेवण्याचे भारताचे लक्ष्य

पुढारी वृत्तसेवा

लंडन; वृत्तसंस्था : लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या (118) शानदार शतकाच्या जोरावर भारताने सामन्यावर आपली पकड घट्ट केली होती. भारताने चहापानाअखेर 6 बाद 304 धावांपर्यंत मजल मारत आपली आघाडी 281 धावांवर नेली होती.

एकीकडे गडी बाद होत असताना, जैस्वालने दुसरी बाजू खंबीरपणे सांभाळली. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक पूर्ण केले. इंग्लंडविरुद्धचे हे त्याचे चौथे शतक ठरले. त्याने आपल्या 118 धावांच्या खेळीत चौफेर फटकेबाजी केली, विशेषतः ऑफ साईडला त्याने धावांचा पाऊस पाडला. यादरम्यान त्याला काही जीवदानही मिळाले, पण त्याने इंग्लंडच्या कमकुवत गोलंदाजीचा पुरेपूर फायदा उचलला. अखेर जेमी ओव्हरटनने त्याला डीप थर्ड मॅनवर झेलबाद करून भारताला मोठा धक्का दिला.

प्रारंभी, भारताने तिसर्‍या दिवसाची सुरुवात 2 बाद 75 या मागील धावसंख्येवरून केल्यानंतर नाईट वॉचमन आकाश दीपने (66) आपल्या अनपेक्षित आणि शैलीदार फलंदाजीने इंग्लंडच्या गोलंदाजांना चकित केले. दुसर्‍या सत्राच्या पहिल्या चेंडूवर गस अ‍ॅटकिन्सनने शुभमन गिलला (11) पायचीत पकडले. त्यानंतर आलेल्या करुण नायरलाही (17) अ‍ॅटकिन्सननेच यष्टिरक्षकाकरवी झेलबाद करून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.

जैस्वाल बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल यांनी भारताचा डाव सावरला. तिसर्‍या दिवशी चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा भारताची आघाडी 281 धावांपर्यंत पोहोचली होती. इंग्लंडचे गोलंदाज भारताचा डाव किती लवकर गुंडाळतात यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून होते.

सुनील गावसकरांचा 774 धावांचा विक्रम अबाधित

शुभमन गिल आपल्या दुसर्‍या डावात अवघ्या 11 धावांवर बाद झाला आणि यामुळे त्याची मालिकेतील एकत्रित धावसंख्या 554 इतकी राहिली. यासह सुनील गावसकरांचा एकाच क सोटी मालिकेतील सर्वाधिक 774 धावांचा विक्रम अबाधित राहिल्याचे सुस्पष्ट झाले. गावसकर यांनी 1970-71 मध्ये विंडीजविरुद्ध एकाच मालिकेत 774 धावांची आतषबाजी केली होती. त्या दौर्‍यात त्यांनी 4 सामन्यांतील 8 डावांत 4 शतके, 3 अर्धशतके झळकावली तर 220 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT