स्पोर्ट्स

India A vs Sri Lanka A : पहिल्या डावात भारताचा धावांचा डोंगर; श्रीलंका ११३/२

भारत ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’ कसोटी सामना

रणजित गायकवाड

गॅले : श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारत ‘अ’ संघाने पहिल्या अनऑफिशियल चार दिवसीय कसोटी सामन्यात यजमान श्रीलंका संघावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने पहिल्या डावात २ गडी गमावून ११३ धावा केल्या असून, ते अजूनही भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा ३३९ धावांनी मागे आहेत. सध्या नुवानिदु फर्नांडो (नाबाद ६५) आणि आशन बंधारा (नाबाद १८) क्रीजवर टिकून आहेत.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारत ‘अ’ संघाने १११.४ षटकांत ६ गडी गमावून ४५२ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. भारताकडून मधल्या फळीतील फलंदाज साई सुदर्शनने अप्रतिम फलंदाजी करत १३२ धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार ध्रुव ज्युरेलने १४१ धावांची नाबाद शतकी खेळी करत भारताला मोठ्या धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. याशिवाय शेख रशीदने ६३ आणि आयुष पांडेने २५ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून चमिका गुणसेकराने सर्वाधिक ३ बळी घेतले.

श्रीलंकेची सावध सुरुवात : भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना यजमान श्रीलंका ‘अ’ संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर निरोशन डिकवेला अवघ्या १० धावांवर अंशुल कंबोजचा बळी ठरला. त्यानंतर पवनथा वीरासिंगे (११) याला यश ठाकूरने बाद करत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. मात्र, त्यानंतर नुवानिदु फर्नांडोने जबाबदारीने खेळत नाबाद ६५ धावा केल्या आणि संघाचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाअखेर श्रीलंकेची स्थिती ३१ षटकांत २ बाद ११३ अशी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT