IND vs ENG 4th Test Day 1 : भारत पहिल्या दिवसअखेर 4 बाद 264 Pudhari File Photo
स्पोर्ट्स

IND vs ENG 4th Test Day 1 : भारत पहिल्या दिवसअखेर 4 बाद 264

जैस्वाल-सुदर्शनच्या अर्धशतकांनी सावरले; राहुल-जैस्वालची महत्त्वपूर्ण सलामी

पुढारी वृत्तसेवा

मँचेस्टर; वृत्तसंस्था : इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल व साई सुदर्शनच्या संयमी अर्धशतकांच्या जोरावर भारताने दिवसअखेर 4 बाद 264 धावांपर्यंत मजल मारली. प्रतिकूल वातावरणात प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी चिवट खेळ करत संघाला सन्मानजनक स्थितीत पोहोचवले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रवींद्र जडेजा (19) आणि शार्दूल ठाकूर (19) खेळपट्टीवर नाबाद होते.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या भारताची सुरुवात के. एल. राहुल (46) आणि यशस्वी जैस्वाल (58) यांनी दमदार केली. या दोघांनी सावधपणे खेळत मालिकेतील सर्वोत्तम 94 धावांची सलामी भागीदारी रचली. जैस्वाल बाद झाल्यानंतर, करुण नायरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या साई सुदर्शनने (61) मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने 151 चेंडूंचा सामना करत एक महत्त्वपूर्ण आणि संयमी खेळी साकारली आणि भारताचा डाव सावरला. तथापि, मधल्या फळीतील इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्याने भारताची धावगती मंदावली. पहिल्या दिवसाचा खेळ कमी प्रकाशामुळे लवकर थांबवण्यात आला.

50 वर्षानंतर प्रथमच...

या दरम्यान, जैस्वाल ओल्ड ट्रॅफर्डवर अर्धशतक झळकावणारा तब्बल 50 वर्षानंतरचा पहिलाच भारतीय सलामीवीर ठरला. यापूर्वी 1974 मध्ये सुनील गावसकर यांनी असा पराक्रम गाजवला होता.

के. एल. राहुलचा नवा पराक्रम! इंग्लंडमध्ये 1000 कसोटी धावा

भारताचा सलामीवीर फलंदाज के.एल. राहुलने या सामन्यात 11 धावा करताच एका विशेष विक्रमाला गवसणी घातली. त्याने इंग्लंडमध्ये 1000 कसोटी धावांचा टप्पा पूर्ण केला असून, अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला. या कामगिरीसह त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवलेे. राहुलने इंग्लंडपूर्वी केवळ भारतातच 1000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

वोक्सच्या यॉर्करचा थेट पायावर आघात; ऋषभ पंत वेदनेने विव्हळत मैदानाबाहेर

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला गंभीर दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सचा एक भेदक यॉर्कर थेट उजव्या पायावर आदळल्याने त्याला ‘रिटायर हर्ट’ व्हावे लागले. ही घटना तेव्हा घडली जेव्हा पंत 48 चेंडूंत 37 धावांवर आत्मविश्वासाने फलंदाजी करत होता. त्याने वोक्सच्या गोलंदाजीवर एक धाडसी ‘रिव्हर्स स्वीप’ खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, वोक्सचा वेगवान आणि अचूक चेंडू बॅटला लागण्याऐवजी थेट पंतच्या पायावर जोरात आदळला. प्राथमिक उपचारानंतरही दुखापतीची तीव्रता स्पष्ट दिसत होती.

असाही योगायोग!

अंशुल कंबोजच्या आधी ओल्ड ट्रॅफर्डवर कसोटी पदार्पण करणारा शेवटचा भारतीय खेळाडू 1990 मध्ये अनिल कुंबळे होता. योगायोग म्हणजे या उभयतांच्या नावाची आद्याक्षरे ‘एके’ अशी आहेत आणि या दोघांनीही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एका डावात 10 बळी घेतले आहेत.

हा खेळ आकड्यांचा!

0 ओल्ड ट्रॅफर्डवर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर इंग्लंडला एकही कसोटी जिंकता आलेली नाही, हा पूर्वानुभव येथे लक्षवेधी आहे!

5 या क सोटी सामन्यातील भारताच्या फलंदाजी लाईनअपमध्ये पहिल्या 7 मधील चक्क 5 फलंदाज डावखुरे होते. के. एल. राहुल व शुभमन गिल हे दोघेच फलंदाज त्याला अपवाद ठरले!

8 यशस्वी जैस्वालने कसोटी क ारकिर्दीत इंग्लंडविरुद्ध आठवे अर्धशतक झळकावले. आश्चर्य म्हणजे त्याचा हा इंग्लंडविरुद्धचा केवळ 16 वा डाव होता.

10 के. एल. राहुल आणि यशस्वी जैस्वाल ही गेल्या दहा वर्षांत इंग्लंडमधील कसोटीच्या पहिल्या दिवशी, सत्रात किमान 20 षटके खेळून उपाहारापर्यंत नाबाद राहिलेली पहिली विदेशी सलामी जोडी आहे. यापूर्वी असा पराक्रम ख्रिस रॉजर्स आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने 2015 मध्ये ओव्हल कसोटीत गाजवला होता.

11 लियाम डॉसनला तिसरी कसोटी खेळल्यानंतर चौथी कसोटी खेळण्यासाठी 2928 दिवस प्रतीक्षा करावी लागली. यादरम्यान, इंग्लंडने 11 वेगवेगळ्या फिरक ी गोलंदाजांना संधी दिली होती.

21.94 कसोटी सामन्यांमध्ये डावखुर्‍या फलंदाजांविरुद्ध जोफ्रा आर्चरची सरासरी 21.94 आहे, तर उजव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध हीच सरासरी 36.10 आहे. लॉर्डस्वर त्याने घेतलेले पाचही बळी डावखुर्‍या फलंदाजांचेच होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT