पुढारी ऑनलाईन डेस्क : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आज (दि.5) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना ॲलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र भारतीय संघाला आपला हा निर्णय सार्थ ठरवता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना रिचा घोषने 14, जेमिमाह रॉड्रिग्जने 23 आणि हरमनप्रीतने 17 धावांचे योगदान दिले. दीप्ती शर्मा (1), हरलीन देओल (8), प्रिया पुनिया (3) आणि स्मृती मानधना (8) स्वस्तात बाद झाल्या. ऑस्ट्रेलियन महिलांच्या गोलंदाजीसमोर भारताने गुडघे टेकले आहेत. त्यांना 34 षटकांत 10 फलंदाजाच्या बदल्यात केवळ 100 धावा करता आल्या आहेत. यावेळी गोलंदाजीमध्ये मेगन शुट हिने 6.2 षटकांत 19 धावा देत पाच खेळाडूंना तंबूत परतवले. याचबरोबर गर्थ, किंग, गार्डनर आणि शदरलँड यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
या सामन्यामध्ये भारताकडून वेगवान गोलंदाज तीतास साधूला पदार्पणाची संधी दिली आहे. त्याच वेळी जॉर्जिया वोलने ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियातील विक्रम सुधारण्यासाठी भारताचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने आतापर्यंत 16 पैकी फक्त चार एकदिवसीय सामने जिंकले आहेत. भारताला 2021 मध्ये शेवटच्या वेळी येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाची कमान अष्टपैलू ताहलिया मॅकग्राकडे आहे. नियमित कर्णधार ॲलिसा हिली गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर आहे.