झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतून सॅमसन, दुबे, जैस्वाल बाहेर पडले आहेत. BCCI Twitter
स्पोर्ट्स

IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात बदल! ‘या’ खेळाडूंची अचानक एंट्री

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ZIM T20 Series : झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या नवीन टीम इंडियामध्ये 3 मोठे बदल करण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट बोर्डाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्या जागी हर्षित राणा, साई सुदर्शन आणि जितेश शर्मा यांची निवड केली आहे. मालिकेतील पहिला सामना 6 जून रोजी होणार आहे.

जैस्वाल, सॅमसन आणि दुबे हे खेळाडू टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग आहेत. ट्रॉफी जिंकल्यानंतर खराब हवामानामुळे भारतीय संघ वेस्ट इंडिजहून परतलेला नाही. बार्बाडोसमधील वादळातून खेळाडूंसह सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे 'बीसीसीआय'ने म्हटले आहे. यासाठी त्यांनी आपला प्लॅनही बदलला आहे. 'पीटीआय'च्या रिपोर्टनुसार संधी मिळताच सर्व 70 सदस्यांना आता ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथून चार्टर फ्लाईटद्वारे थेट नवी दिल्लीला आणले जाईल. अशा परिस्थितीत जैस्वाल, सॅमसन आणि दुबे हे थेट झिम्बाब्वे दौ-यावर न जाता ते प्रथम विजेत्या संघासह दिल्लीला येणार आहेत. त्यानंतर ते झिम्बाब्वेला रवाना होतील, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. एक्सवरून त्यांनी ही माहिती दिली. (IND vs ZIM T20 Series)

बीसीसीआय म्हणाले..

बीसीसीआयने म्हटलंय की, निवड समितीने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांच्या जागी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांची निवड केली आहे.

नवा संघ, नवा कर्णधार

5 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारताचा युवा संघ झिम्बाब्वेला रवाना झाला आहे. संघाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर युवा खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाचे कार्यवाहक प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांचाही समावेश आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा युवा संघ झिम्बाब्वेचा त्यांच्याच देशात क्लिन स्विप करण्यास सज्ज झाला आहे. टी-20 मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. सर्व पाच सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळले जाणार आहेत.

सामन्यांचे वेळापत्रक

पहिला टी-20 सामना : 6 जुलै

दुसरा टी-20 सामना : 7 जुलै

तिसरा टी-20 सामना : 10 जुलै

चौथा टी-20 सामना : 13 जुलै

पाचवा टी-20 सामना : 14 जुलै

पहिल्या-दुसऱ्या टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा.

झिम्बाब्वेचा संघ

सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंडाई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसंट कैया, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली माधेवेरे, तदिवनाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्रँडन मावुता, ब्लेसिंग मुझाराब, ब्लेसिंग मुजराब, ब्रँडन मारुमानी. अंतम नक्वी, रिचर्ड नगारवा, मिल्टन शुम्बा

सामने कोठे पाहायचे?

भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरू होतील. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनीलिव्ह ॲप आणि वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे रेकॉर्ड

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 8 टी-20 सामने झाले आहेत. यातील 6 सामने भारताने तर 2 सामने झिम्बाब्वेने जिंकले आहेत. दोन्ही संघादरम्यान एकूण 66 एकदिवसीय सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने 54, झिम्बाब्वेने 10 विजय मिळवले आहेत. 2 सामन्यांचा निकाल लागलेला नाही. कसोटीतहे भारतीय संघाचेच वर्चस्व आहे. भारताने 11 आणि झिम्बाब्वेने 2 कसोटी सामने जिंकले आहेत. 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.

सुदर्शन-जितेश-हर्षितची लक्षवेधी कामगिरी

22 वर्षीय फलंदाज सुदर्शनने भारतासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 63.50 च्या सरासरीने 127 धावा केल्या आहेत. डिसेंबर 2023 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 30 वर्षीय यष्टीरक्षक जितेशने 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने पदार्पण केले होते. त्याचबरोबर 22 वर्षीय वेगवान गोलंदाज हर्षितची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. आयपीएल 2024 मध्ये त्याने जबरदस्त छाप सोडली. हर्षितने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) साठी 13 सामन्यात 19 बळी घेतले आणि केकेआरला चॅम्पियन बनवण्यात मोठे योगदान दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT