नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या (IND vs WI) दौर्यावर आहे. दोन्ही संघांत प्रथम वन डे आणि त्यानंतर टी-20 मालिका होणार आहे. पहिली वन डे आज शुक्रवारी 22 जुलै रोजी होईल. या सामन्यात शिखर धवन जेव्हा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल तेव्हा इतिहास घडणार आहे.
भारतीय संघाने या वर्षभरात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अनेक कर्णधार बदलले. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डेत जेव्हा शिखर मैदानावर उतरेल तेव्हा तो भारताचा या वर्षातील सातवा कर्णधार असेल. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कर्णधार करणार्या जागतिक विक्रमाशी भारत बरोबरी करणार आहे. याआधी श्रीलंकेने एका वर्षात सात कर्णधार वापरले होते.
हे वर्ष संपण्यासाठी अजून 5 महिने शिल्लक आहेत आणि या काळात अजून एक नवा कर्णधार केल्यास भारताला या वर्षातील आठवा कर्णधार मिळेल. त्याचबरोबर श्रीलंकेचा विक्रम मोडला जाईल. क्रिकेटच्या इतिहासात एका वर्षात सर्वाधिक कर्णधार श्रीलंकेने 2017 मध्ये केले होते. याशिवाय झिम्बाब्वे, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी आतापर्यंत प्रत्येकी 6 कर्णधारांची एका वर्षात नियुक्ती केली होती.
वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौर्यात विराट कोहली जखमी झाला म्हणून कसोटी मालिकेत के.एल. राहुलकडे कर्णधारपद देण्यात आले. त्याच दौर्यात रोहित शर्मा वन डे मालिकेसाठी उपलब्ध नसल्याने राहुल नेतृत्व करत होता. त्यानंतर रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध संघाचे नेतृत्व केले.
आयपीएलनंतर द. आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत रोहित, राहुलच्या गैरहजेरीत ऋषभ पंतकडे कर्णधारपद आले. त्यानंतर आयर्लंड दौर्यावर हार्दिक पंड्या संघाचा कर्णधार झाला. पुन्हा इंग्लंड दौर्यावर रोहितला कोरोना झाल्याने जसप्रीत बुमराहला पाचव्या कसोटीत कर्णधार करण्यात आले. आता वेस्ट इंडिज दौर्यात शिखरला कर्णधार करण्यात आले.
भारताला राखीव फळीचा उपयोग करून घेण्याची संधी (IND vs WI)
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजपासून वेस्ट इंडिजला वन डे मालिकेत भिडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत भारताने 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान वेस्ट इंडिजचा फॉर्म पाहता भारतीय संघाला ही वन डे मालिका जिंकणे फार अवघड जाणार नाही. या मालिकेत भारताला राखीव फळीचा योग्य उपयोग करून घेण्याची संधी आहे.
ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, संजू सॅमसन आदी युवा खेळाडूंवर लक्ष असणार आहे. 2009 पासून भारतीय संघ वन डे मालिकेत विंडीजविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर अपराजित आहे. 2009 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2-1 असा विजय, 2011 मध्ये सुरेश रैनाच्या कर्णधारपदाखाली 3-2 असा विजय, 2017 व 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे 3-1 व 2-0 असा विजय टीम इंडियाने मिळवला आहे.
संघ यातून निवडणार :
भारत : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
वेस्ट इंडिज : निकोलस पूरन (कर्णधार), शमराह ब्रूक्स, किसी कार्टी, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ब्रैंडन किंग, काईल मेयर्स, गुडाकेश मोती, किमो पॉल, रोवमॅन पॉवेल, जायडेन सील्स.
टीम इंडियाचा इनडोअर सराव
इंग्लंड विरुद्धची टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकून भारतीय संघ कॅरेबियन बेटांवर पोहोचला आहे. तिथे वेस्ट इंडिज विरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांच्या दोन मालिका भारतीय संघाला खेळायच्या आहेत. शुक्रवारपासून (22 जुलै) एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाने सराव सुरू केला आहे. मात्र, त्रिनिदादमधील पावसाने भारताच्या सराव सत्रात अडथळा आणला आहे.
भारतीय संघ बुधवारी (20 जुलै) त्रिनिदादला पोहोचला आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी मिळालेल्या वेळेचा फायदा करून घेण्यासाठी संघ व्यवस्थापनाने सराव सत्राचे आयोजन केले होते. मात्र, त्रिनिदादमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. यावर उपाय म्हणून प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इनडोअर नेटमध्ये संघाचा सराव घेतला. यावेळी संघातील सर्व खेळाडू कसून सराव करताना दिसले.