ind vs wi test gill become first indian captain in 21st century to hit 50 score in debut innings at home
अहमदाबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने दमदार अर्धशतक झळकावले आहे. त्याने ५० धावांची खेळी केली. मात्र, रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो जस्टिन ग्रीव्ह्सकरवी झेलबाद झाला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना केवळ १६२ धावा केल्या. यानंतर भारतासाठी केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. राहुलने संयमी फलंदाजी करत शतक झळकावले, तर कर्णधार गिलने अर्धशतक पूर्ण केले. मात्र, गिल आपली खेळी मोठी करू शकला नाही आणि ५० धावांवर बाद झाला.
शुभमन गिल २१ व्या शतकात घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच कसोटी डावात ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांनाही ही कामगिरी घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या डावात साधता आली नव्हती. गिलच्या आधी, घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून पहिल्याच डावात ५०+ धावांचा टप्पा ओलांडणारे अखेरचे भारतीय कर्णधार सुनील गावसकर होते. त्यांनी १९७८ मध्ये वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध २०५ धावांची शानदार खेळी केली होती.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात शुभमन गिलने संयमी फलंदाजीचा नमुना सादर केला आणि विरोधी गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. त्याने केलेल्या ५० धावांच्या खेळीत ५ चौकारांचा समावेश होता. याच ५ चौकारांसह त्याने कसोटी क्रिकेटमधील आपले ३०० चौकार पूर्ण करण्याची विशेष कामगिरी आपल्या नावावर नोंदवली आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी प्रभावी प्रदर्शन केले होते. भारतीय वेगवान मा-यासमोर विंडिजच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकण्याची संधी मिळाली नाही. मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार बळी घेतले. तर बुमराहने तीन विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजचा संघ केवळ १६२ धावांवर गारद झाला. यानंतर भारतीय संघासाठी केएल राहुलने १०० धावांची उत्कृष्ट खेळी साकारली.