अहमदाबाद : आशिया चषक स्पर्धेतील दिमाखदार विजयानंतर दोन दिवसांच्या आतच भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मंगळवारी मैदानात उतरत तयारी सुरू केली. मात्र, या तयारीदरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फिरकीपटू कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी विश्रांती घेतली.
इंग्लंडमध्ये कडवी झुंज देऊन 2-2 अशी मालिका बरोबरीत राखणार्या गिलच्या नेतृत्वाखालील नव्या भारतीय कसोटी संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील हे पहिलेच घरचे आव्हान असेल.
कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह संघातील सदस्य येथे पोहोचले आणि त्यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर जवळपास तीन तास सराव केला.
रविवारी आशिया चषक संपन्न झाल्यानंतर तीन-एक दिवसातच विंडीजविरुद्धची मालिका सुरु होत असल्याने येथे भारतीय खेळाडूंना फारशी विश्रांती घेता आलेला नाही. विंडीजविरुद्धची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे.
या मालिकेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय खेळाडूंनी हलक्या स्वरूपातील वॉर्म-अपसह नेटमध्ये सराव केला. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी हवामान स्वच्छ झाल्यावर जवळपास 45 मिनिटे गोलंदाजी केली. संघाचे आगमन झाल्यावर गंभीर यांनी खेळपट्टीची पाहणी केली आणि सराव संपल्यावर त्यांनी पुन्हा एकदा खेळपट्टीवर नजर टाकली.
सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल उत्कृष्ट बहरात दिसले, त्याचप्रमाणे दुसर्या अनौपचारिक कसोटीत भारत ’अ’ चे नेतृत्व करणारा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल देखील चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. अन्य मधल्या फळीतील फलंदाज बी. साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांचाही उत्तम समन्वय दिसत होता, परंतु कर्णधार गिलला मात्र भारतीय वेगवान गोलंदाज आणि थ्रो डाऊन स्पेशालिस्टकडून काही प्रमाणात त्रास झाला.