ind vs wi test series shubman gill and kl rahul unique record in test cricket history
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत असे काही पाहायला मिळाले, जे यापूर्वी सुमारे ६१ वर्षांपूर्वी घडले होते. एका बाजूला केएल राहुल शतक पूर्ण करण्यात यशस्वी झाला, तर दुसऱ्या बाजूला कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक साकारले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर मोठी आघाडी घेत सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आज असे काय घडले, जे यापूर्वी केवळ एकदाच घडले होते, जाणून घेऊया माहिती.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर संपुष्टात आला. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा सलामीवीर यशस्वी जैस्वाल लवकर बाद झाला. त्याने केवळ ३५ धावा केल्या. त्यानंतर साई सुदर्शन देखील फक्त सात धावा करून तंबूत परतला.
एक बाजू सलामीवीर केएल राहुलने समर्थपणे सांभाळून ठेवली, तर शुभमन गिलने त्याला मोलाची साथ दिली. कर्णधार शुभमन गिल १०० चेंडूंमध्ये ५ चौकारांच्या मदतीने ठीक ५० धावा करून बाद झाला. केएल राहुलने १९७ चेंडूंमध्ये १२ चौकारांसह ठीक १०० धावांची खेळी साकारली. भारतीय संघाच्या दोन फलंदाजांनी कसोटीच्या एका डावात बरोबर ५० आणि १०० धावा करून बाद होण्याची घटना सुमारे ६१ वर्षांनी घडली आहे.
यापूर्वी, हा कारनामा सन १९६४ मध्ये झाला होता. त्यावेळी दिल्लीमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना सुरू होता. भारताकडून एमएल जयसिम्हा यांनी ५० आणि बुधी कुंदरन यांनी १०० धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या कसोटीत गिल किंवा राहुलपैकी एकाही फलंदाजाने एक धाव अधिक केली असती, तर या ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी होऊ शकली नसती. त्यामुळे, हा योगायोगच म्हणावा लागेल, म्हणूनच हा पराक्रम तब्बल ६१ वर्षांनंतर पाहायला मिळाला.