स्पोर्ट्स

IND vs WI ODI-T20 Series : विंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघनिवड! हार्दिक पंड्या, ऋषभ पंत यांच्‍याबद्दल उत्‍सुकता

६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सामन्यांसाठीचा टी-२० संघ प्रामुख्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतील संघाशी मिळताजुळता असण्याची शक्यता

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या वन-डे आणि टी-२० मालिकेसाठी राष्ट्रीय निवड समितीची बैठक बुधवारी येथे पार पडणार आहे. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला मर्यादित षटकांच्‍या क्रिकेटमध्ये पुन्हा संधी देणे आणि पूर्णपणे तंदुरुस्त झालेल्या हार्दिक पंड्याचा संघात समावेश करणे, असे दोन प्रमुख मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. भारत या दौऱ्यात वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे.

६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सामन्यांसाठीचा टी-२० संघ प्रामुख्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतील संघाशी मिळताजुळता असण्याची शक्यता आहे. मात्र, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीसमोर उपलब्ध पर्यायांमधून एकदिवसीय संघ निवडण्याचे मोठे आव्हान असेल.

हार्दिक पंड्या २० सप्टेंबर रोजी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार असून, पुद्दुचेरी येथे ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी त्याची भारत ‘अ’ संघात आधीच निवड झाली आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका २७ सप्टेंबरपासून तिरुवनंतपुरम येथे सुरू होत आहे. त्यामुळे हार्दिक आंतरराष्ट्रीय सामन्यात लागोपाठ १० षटके गोलंदाजी करण्यास आणि ५० षटके क्षेत्ररक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज आहे का, याचा निर्णय निवड समितीला घ्यावा लागेल.

पंतचे ५० षटकांच्या संघात पुनरागमन शक्य

‘आयपीएल’मधील सुमार कामगिरीमुळे पंतने कसोटीचे उपकर्णधारपद तसेच मर्यादित षटकांच्या संघातील स्थान गमावले होते. मात्र, इशान किशन जपान दौऱ्यावर असल्याने १५ जणांच्या संघात या डावखुऱ्या फलंदाजाला पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या संघात लोकेश राहुल हा यष्टिरक्षकासाठी पहिली पसंती असेल. तसेच, श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत राहुलकडे कर्णधार शुभमन गिलचा उपकर्णधार म्हणून जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार असल्याने कर्णधार गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे. राखीव सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्‍वाल, तर मधल्या फळीतील राखीव फलंदाज म्हणून रजत पाटीदार यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर हे दोघेही भारत ‘अ’ संघाकडून खेळणार असून, गायकवाड त्या संघाचे नेतृत्व करेल.

शमी, चहलचा आताही विचार होणार नाही?

जसप्रीत बुमराह आशियाई स्पर्धेत व्यस्त असल्याने तो या मालिकेसाठी उपलब्ध नसेल. सध्याच्या घडीला मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल या अनुभवी खेळाडूंचा संघात समावेश होण्याची शक्यता धूसर मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT