स्पोर्ट्स

IND vs WI 2nd ODI : गुवाहाटीत कॅरेबियन वादळ! वेस्टइंडिजने ठोकल्या ४०५ धावा, टीम इंडियाच्या गोलंदाजांची दाणादाण

एकाच डावात ३ वेस्टइंडिज फलंदाजांचे शतक, ४३ वर्षांनंतर भारताविरुद्ध रचली सर्वोच्च धावसंख्या

रणजित गायकवाड

गुवाहाटी : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीत कॅरेबियन संघाने नवा इतिहास रचला आहे. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्टइंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ७ बाद ४०५ धावांचा विशाल डोंगर उभारत एकदिवसीय क्रिकेटमधील आपली आजवरची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. या विक्रमी खेळीच्या जोरावर वेस्टइंडिजने भारतासमोर विजयासाठी ४०६ धावांचे कठीण आव्हान ठेवले आहे.

४३ वर्षांनंतर मोडला भारताविरुद्धचा विक्रम

वेस्टइंडिजने भारताविरुद्ध तब्बल ४३ वर्षांपूर्वी नोंदवलेला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. यापूर्वी ७ डिसेंबर १९८३ रोजी जमशेदपूर येथे झालेल्या सामन्यात कॅरेबियन संघाने भारताविरुद्ध ८ बाद ३३३ धावा केल्या होत्या. गुवाहाटी येथील लढतीत वेस्टइंडिजने अवघ्या ४२ व्या षटकातच हा टप्पा ओलांडून नवा उच्चांक प्रस्थापित केला. तसेच, २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्ध नोंदवलेला ३८९ धावांचा स्वतःचा सर्वकालीन विक्रमही त्यांनी मागे टाकला.

एकाच डावात तीन शतके; जागतिक क्रिकेटमध्ये केवळ सहाव्यांदा नोंद

कॅरेबियन डावाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या तीन प्रमुख फलंदाजांनी झळकावलेली शतके. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकाच संघातील तीन फलंदाजांनी शतके ठोकण्याची ही एकूण सहावीच वेळ ठरली. वेस्टइंडिजच्या क्रिकेट इतिहासात तसेच भारताविरुद्ध असा पराक्रम पहिल्यांदाच घडला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाच डावात तीन शतके ठोकली होती.

  • जॉन कॅम्पबेल: ६८ चेंडूंत १०१ धावा

  • कर्णधार शाई होप: ९४ चेंडूंत १०४ धावा

  • आमिर जंगू: ७७ चेंडूंत ११४ धावा

या तिघांनी मिळूनच ३०० हून अधिक धावांची भर घातली, ज्यामुळे संघाला ४०० चा टप्पा सहज ओलांडता आला.

आकडेवारीच्या चष्म्यातून विक्रमी नोंदी

वेस्टइंडिजच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम ५ धावसंख्या:

  • ४०५/७ वि. भारत (गुवाहाटी, २०२६)

  • ३८९ वि. इंग्लंड (सेंट जॉर्ज, २०१९)

  • ३८५/७ वि. आयर्लंड (डब्लिन, २०२५)

  • ३८१/३ वि. आयर्लंड (डब्लिन, २०१९)

  • ३७४/६ वि. नेदरलँड्स (हरारे, २०२३)

भारताविरुद्ध प्रतिस्पर्धी संघांनी उभारलेल्या सर्वोच्च धावसंख्या:

४३८/४ – दक्षिण आफ्रिका (वानखेडे, २०१५)

४११/८ – श्रीलंका (राजकोट, २००९)

४०५/७ – वेस्टइंडिज (गुवाहाटी, २०२६)

३८९/४ – ऑस्ट्रेलिया (सिडनी, २०२०)

३८७/३ – इंग्लंड (लॉर्ड्स, २०२६)

भारतीय गोलंदाजांची धुलाई; कुलदीपचे २०० बळी पूर्ण

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारतीय कर्णधार शुभमन गिलचा निर्णय पूर्णपणे अंगलट आला. पदार्पण करणाऱ्या आकिब नबी दारला सूर गवसला नाही; त्याने ८.५ षटकांत बिनबाद ८४ धावा दिल्या. गुरनूर ब्रारने दोन बळी मिळवले खरे, मात्र १० षटकांत ९६ धावा लुटवल्या.

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा केवळ ५ षटके टाकून (१/४५) दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला, तर नमन धीरही दुखापतग्रस्त होण्यापूर्वी ६.१ षटकांत ३८ धावा देऊन निष्प्रभ ठरला. फिरकीपटू रवींद्र जडेजाने १० षटकांत ७५ धावा देऊन २ गडी बाद केले. दरम्यान, कुलदीप यादवने १० षटकांत ६५ धावांत २ बळी मिळवत एकदिवसीय कारकिर्दीतील २०० बळींचा टप्पा पूर्ण केला.

भारतीय संघासमोर अग्निपरीक्षा

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग कधीही केलेला नाही. भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी पाठलाग २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६० धावांचा (जयपूर) राहिला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माने नाबाद १४१ धावांची खेळी केली होती. त्यामुळे ४०६ धावांचे हे अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य गाठायचे असल्यास भारतीय फलंदाजांना, विशेषतः अनुभवी रोहित शर्माला पुन्हा एकदा असाधारण खेळी करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT