स्पोर्ट्स

Yashasvi Jaiswal Sledge Dickwella : ‘एक सिक्स मार, IPL मध्ये घेतो!’ जैस्वालच्या माइंडगेमने डिकवेलाची केली शिकार, VIDEO व्हायरल

शाब्दिक चकमकीत लक्ष विचलित झाले अन् डिकवेलाने विकेट फेकली

रणजित गायकवाड

IND vs SL : Yashasvi Jaiswal Sledges Dickwella With IPL offer Watch Video

गाल : गाल कसोटीच्या पाचव्या दिवशी मैदानावर केवळ चेंडू आणि बॅटचाच थरार रंगला नाही, तर खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक आणि मानसिक दबावतंत्राचा (माइंड गेम) रंजक खेळही पाहायला मिळाला. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने श्रीलंकेचा यष्टीरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेला याच्याविरुद्ध आखलेली रणनीती कमालीची सफल ठरली.

जैस्वालने डिकवेलाला षटकार मारण्याचे थेट आव्हान दिले आणि षटकार खेचल्यास 'आयपीएल'मध्ये संधी मिळवून देण्याची जबाबदारी घेण्याची मिश्कील ऑफर दिली. डिकवेलानेही या संवादाला हसतमुखाने प्रतिसाद दिला खरा, मात्र त्यानंतर काहीच क्षणांत एका बेजबाबदार फटक्यामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील गाल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडला असताना डिकवेला फलंदाजीसाठी मैदानात आला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत होते.

कर्णधार धनंजय डी सिल्वा आणि सोनल दिनुशा यांनी काही काळ भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना करत भागीदारी रचली होती; परंतु रवींद्र जडेजाने डी सिल्वाला बाद करत ही जोडी फोडली आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

IPL च्या आमिषात अडकले डिकवेला

डी सिल्वा बाद झाल्यानंतर निरोशन डिकवेला क्रीजवर आला. यावेळी शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत असलेला यशस्वी जैस्वाल सातत्याने त्याच्याशी संवाद साधून त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता. जैस्वालने डिकवेलाला पहिल्या डावातील फटक्यांची आठवण करून देत षटकार मारण्यासाठी उकसवले.

जैस्वाल म्हणाला, ‘पहिल्या डावात तू अनेक आक्रमक फटके खेळला होतास, आताही काहीतरी करून दाखव. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका का मारत नाहीस?’ यावर डिकवेलाने उत्तर दिले, ‘त्याची काही गरज नाही; आधी मला आयपीएलमध्ये घेऊन चल, मग षटकार मारेन.’ जैस्वालने हीच संधी साधत तात्काळ आश्वासन देत, ‘शंभर टक्के, आम्ही तुला नक्की घेऊन जाऊ. फक्त एक षटकार मारून दाखव, मी स्वतः तुला आयपीएलमध्ये एन्ट्री मिळवून देईन.’ त्यावर डिकवेलाने केवळ ‘थँक यू’ असे उत्तर दिले.

कृष्णाच्या गोलंदाजीवर शिकार

या हलक्याफुलक्या शाब्दिक चकमकीनंतर मैदानात जे घडले, ते मात्र डिकवेला आणि श्रीलंकेसाठी धक्कादायक ठरले. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने लागोपाठ उसळते (शॉर्ट-पिच) चेंडू टाकत डिकवेलावर प्रचंड दबाव आणला. षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एका उसळत्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू डिकवेलाच्या बॅटची कड घेऊन हवेत उडाला. यष्टीरक्षक ऋषभ पंतने कोणताही गाफीलपणा न दाखवता सोपा झेल टिपला. अवघ्या १० धावांवर डिकवेला बाद झाला आणि जैस्वालच्या चतुर रणनीतीमुळे भारताला अत्यंत महत्त्वाची विकेट मिळाली.

भारताचा १६५ धावांनी दिमाखदार विजय

डिकवेला बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. तत्पूर्वी, जडेजाने डी सिल्वाला ५९ धावांवर माघारी धाडले होते. भारताने विजयासाठी दिलेल्या ३७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ दुसऱ्या सत्रात अवघ्या २०६ धावांवर गारद झाला. यासह भारतीय संघाने गाल कसोटी १६५ धावांनी खिशात घालत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी भक्कम आघाडी मिळवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT