स्पोर्ट्स

IND vs SA : मालिकेतील आव्हान जिवंत

Arun Patil

विशाखापट्टणम ; वृत्तसंस्था : (IND vs SA) पहिले दोन सामने गमावल्यानंतर मालिका वाचवण्याच्या दबावात असलेल्या भारतीय संघाने तिसर्‍या टी-20 सामन्यात धडाकेबाज कामगिरी करीत दक्षिण आफ्रिकेवर 48 धावांनी मोठा विजय मिळवला. भारताच्या ऋतुराज गायकवाड (57) आणि ईशान किशन (54) यांनी फलंदाजीत, तर हर्षल पटेल (4 विकेट) आणि युजवेंद्र चहल (3 विकेट) यांनी गोलंदाजीत विजयासाठी योगदान दिले. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 बाद 179 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकन संघाला 131 धावांत गुंडाळले. या विजयामुळे पाच सामन्यांची मालिका आता 2-1 अशी झाली आहे.

विशाखापट्टणमच्या मैदानावर भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फारसी चांगली झाली नाही. कर्णधार टेम्बा बवुमा 8 धावांवर बाद झाला. अक्षर पटेलने त्याला बाद केले. पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर रिझा हेन्रिक्सला (23) हर्षल पटेलने बाद केले. यानंतर ड्वेन प्रिटोरियस (20) आणि रॅसी वॅन डेर ड्युसेन (1) यांना युजवेंद्र चहल याने लागोपाठच्या षटकांत बाद केले.

आयपीएल स्टार डेव्हिड मिलर (3) या सामन्यात चमकण्यापूर्वीच हर्षल पटेलने त्याला परत पाठवले. आपली क्लासिक खेळी साकारण्याच्या प्रयत्नात असलेल्या हेन्रिक क्लासेन याला चहलने 29 धावांवर बाद केले. यानंतर तळाच्या फलंदाजांपैकी वेन पार्नेल (नाबाद 22) आणि केशव महाराज (11) यांनी थोडेफार विजयासाठी प्रयत्न केले; परंतु 19.1 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 131 धावांत गारद झाला. (IND vs SA)

तत्पूर्वी, द. आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने सलग तिसर्‍यांदा नाणेफेक जिंकली आणि भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. ऋतुराज गायकवाडला मोक्याच्या सामन्यात सूर गवसला. ऋतुराजने पहिले अर्धशतक झळकावले. ईशान किशननेेही फॉर्म कायम राखताना आणखी एक अर्धशतक झळकावले. ऋतुराज व ईशानने 10 षटकांत 97 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. केशव महाराजने ही भागीदारी तोडली. 35 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 57 धावा करणार्‍या ऋतुराजला त्याने अफलातून झेल घेत बाद केले.

ऋतुराज माघारी परतल्यानंतर ईशानने आक्रमक पवित्रा धारण केला. त्यानेही 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. श्रेयस अय्यरला तबरेज शम्सीने 13 व्या षटकात 14 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर पुढील पाचव्या चेंडूवर टीम इंडियाला मोठा धक्का बसला. ड्वेन प्रिटोरियसने टाकलेल्या ऑफ कटर स्लोव्हर चेंडूवर ईशानचा फटका चुकला व तो रिझा हेंड्रिक्सच्या हाती झेलबाद झाला. ईशानने 35 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 54 धावा केल्या.

रॅसी वॅन डेर ड्युसेनने टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंतला 4 धावांवर जीवदान दिले; पण प्रिटोरियसच्या त्याच षटकात पंत 6 धावांवर बाद झाला. दिनेश कार्तिकही 6 धावांवर माघारी परतला. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकात सुरेख फटके मारून भारताला तगडे आव्हान उभे करून दिले. पंड्याने 31 धावा करताना भारताची धावसंख्या 5 बाद 179 पर्यंत पोहोचवली.

भारत : 20 षटकांत 5 बाद 179 धावा. (ऋतुराज गायकवाड 57, ईशान किशन 54. ड्वेन प्रिटोरियस 2/29)
दक्षिण आफ्रिका : 19.1 षटकांत सर्वबाद 131 धावा. (हेन्रिक क्लासेन 29, रिझा हेन्रिक्स 23. (हर्षल पटेल 4/25, युजवेंद्र चहल 3/20)

SCROLL FOR NEXT