नवी दिल्ली : विंडीजविरुद्ध मायदेशातील दोन कसोटी सामन्यांत अर्धशतक आणि नाबाद शतक झळकावणारा तसेच भारताने मालिका जिंकून क्लीन स्वीप देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या शुभमन गिलला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडावे लागले आहे. मात्र, आता भारतीय संघ पुन्हा एकदा कसोटी प्रकारात खेळणार असून गिलला लवकर फॉर्म मिळावा, अशी चाहत्यांची, संघव्यवस्थापनाची अपेक्षा असेल. या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल यांनी मंगळवारी पहिल्या सराव सत्रात कसून सराव केला.
मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधून कसोटी फॉरमॅटशी जुळवून घेण्यासाठी वेळ आणि संयम लागतो. हे लक्षात घेता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार शुभमन गिलने मंगळवारी जवळपास दीड तास नेटमध्ये जोरदार सराव केला. गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत 1-1 अशा बरोबरीनंतर दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्या पार्श्वभूमीवर, भारताविरुद्ध कडवे आव्हान उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
गिलला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फारशा धावा करता आलेल्या नाहीत. ऑस्ट्रेलियातील मर्यादित षटकांच्या मालिकेत, गिलने वन डे व टी20 मालिकेत केवळ एकदाच कॅरारा ओव्हलवर 46 धावांची खेळी साकारली. कसोटी कर्णधार म्हणून परतलेल्या गिलने येथे नेटवर सराव सुरु करण्यापूर्वी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सहाय्यक प्रशिक्षक सितांशू कोटक यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. यात गिलच्या तंत्रावर भर देण्यात आला होता.
यानंतर गिलने स्लिप-कॅचिंग सरावासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत भाग घेतला आणि नंतर यशस्वी जैस्वालसोबत पॅड घालून तीव्र फलंदाजी सत्रासाठी सज्ज झाला.
स्पिनविरुद्ध खेळायला सुरुवात करताना, गिलने रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा सामना केला आणि मधूनमधून स्वीप मारत आपले फटके जमिनीवर ठेवले. वेगवान गोलंदाजीच्या नेटमध्ये त्याने जसप्रीत बुमराहच्या काही षटकांचा सामना केला, त्यानंतर स्थानिक वेगवान गोलंदाज आणि नितीश कुमार रेड्डी यांनी सीम मूव्हमेंटने त्याची परीक्षा घेतली.
यानंतर सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने ’साइडआर्म’ वापरून उंचीवरून थ्रोडाउन दिले, ज्यामुळे अतिरिक्त उसळी आणि वेग निर्माण झाला. साइड नेटमध्ये एक तासाहून अधिक काळ घालवल्यानंतर, गिल मध्यभागी असलेल्या खेळपट्टीवर अर्धा तास थ्रोडाउनसाठी गेला, जिथे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल त्याचे बारकाईने निरीक्षण करत होते. मॉर्केलने स्वतः काही चेंडू टाकले, ज्यात चांगला वेग आणि उसळी होती.
रणजी करंडकात राजस्थानकडून 67 आणि 156 धावांची खेळी करणारा यशस्वी जैस्वालनेही मधल्या मैदानावर बराच वेळ फलंदाजी केली. त्याने मॉर्केल आणि थ्रोडाउन तज्ज्ञाच्या सत्रादरम्यान आत्मविश्वासाने ड्राइव्ह आणि पूल शॉट्स मारले.
फलंदाजांमध्ये साई सुदर्शननेही नेटमध्ये महत्त्वपूर्ण वेळ घालवला. तामिळनाडूच्या या डावखुऱ्या फलंदाजाने दक्षिण आफ्रिका ’अ’ विरुद्धच्या दोन अनौपचारिक कसोटीत केवळ 84 धावा केल्या असूनही, महत्त्वपूर्ण अशा तिसऱ्या क्रमांकाच्या स्थानासाठी संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा त्याला मिळत आहे. त्याने आतापर्यंत दोन उल्लेखनीय कसोटी खेळी केल्या आहेत-मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध 61 आणि मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध 87-परंतु त्याचे स्थान अजून निश्चित झालेले नाही.
त्याचे भारत ’अ’ मधील साथीदार-केएल राहुल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज-यांनी बंगळुरूमध्ये दमछाक करणाऱ्या ’अ’ मालिकेनंतर ऐच्छिक सत्रातून विश्रांती घेतली, परंतु साईने नेटमध्ये पूर्ण तीव्रतेने सराव केला, तो वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांनाही सामोरे गेला.
तिसरे स्थान चर्चेचा विषय राहिले आहे, विशेषत: ध्रुव जुरेल उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने. दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंत यष्टीरक्षणाचे कर्तव्य पुन्हा सुरू करेल, अशी अपेक्षा असताना जुरेलला शुद्ध फलंदाज म्हणून खेळवले जाऊ शकते, अशीही अटकळ आहे.
कसोटीमध्ये 47.77 च्या सरासरीने धावा काढणाऱ्या आणि वेस्ट इंडिजविरुद्ध आपले पहिले शतक झळकावणाऱ्या जुरेलचा प्रथम श्रेणीतील फॉर्म उत्कृष्ट आहे-त्याने गेल्या पाच सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली आहेत, ज्यात दक्षिण आफ्रिका ’अ’ विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील दोन शतकांचा समावेश आहे.
वेगवान गोलंदाजांमध्ये फक्त जसप्रीत बुमराह सराव करण्यासाठी आला. त्याने सुमारे 15 मिनिटे दोन स्टंप्सना लक्ष्य करत ऑफ स्टंपवर गोलंदाजी केली आणि आपला सराव हलका ठेवला. त्याने थोडक्यात फलंदाजीही केली आणि संघसहकाऱ्यांशी संवाद साधला. त्याच्या उजव्या गुडघ्यावर हलकी पट्टी बांधलेली दिसत होती, पण गंभीर आणि मॉर्केल यांच्या देखरेखीखाली त्याने गोलंदाजी केली.
जवळपास तीन तासांच्या प्रशिक्षणानंतर, संघाची विचारसरणी-गंभीर, कोटक, मॉर्केल आणि गिल-खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी मध्यभागी जमले. मॉर्केल आणि गिल यांनी खेळपट्टीची कडकपणा तपासला आणि नंतर क्युरेटर सुजन मुखर्जी यांना 15 मिनिटांच्या चर्चेसाठी बोलावले. त्यांच्या हावभावांवरून, हा गट खेळपट्टीवर पूर्णपणे समाधानी असल्याचे दिसत नव्हते.
खेळपट्टी तपकिरी असून त्यावर हलक्या हिरवळीचे पट्टे होते. या हंगामात येथे झालेल्या दोन रणजी सामन्यांमध्ये, वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि मोहम्मद शमी यांना सुरुवातीला संघर्ष करावा लागला होता, नंतर दिवसाच्या उत्तरार्धात शमीच्या रिव्हर्स स्विंगने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
पाकिस्तानमध्ये, हार्मर (13), मुथुसामी (11) आणि महाराज (9) यांनी दोन कसोटी सामन्यांमध्ये मिळून 33 बळी घेतले. यात मुथुसामीने 106 धावा देखील केल्या. तो ‘मालिकावीर’ ठरला होता.