कोलकाता : भारताचा फॉर्ममध्ये असलेला यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव ज्युरेल उद्यापासून (शुक्रवार, दि. 14) ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी सज्ज आहे. यादरम्यान, गोलंदाजी अष्टपैलू नितीशकुमार रेड्डीला द. आफ्रिका अ संघाविरुद्ध वन डे मालिकेत खेळण्यासाठी या कसोटी संघातून मुक्त करण्यात आले आहे, असे यावेळी सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट म्हणाले.
24 वर्षीय ज्युरेल हा जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने मागील पाच प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4 शतके झळकावली आहेत. यात गत आठवड्यात बंगळूरमध्ये दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्धच्या सामन्यातील 2 शतकांचा समावेश आहे. जुलैमध्ये इंग्लंड मालिकेदरम्यान पायाला झालेल्या फ्रॅक्चरमधून सावरल्यानंतर ऋषभ पंतने संघात पुनरागमन केल्यामुळे, दोन्ही यष्टिरक्षक एकाच वेळी संघात खेळतील की नाही याबद्दल तर्कवितर्क लावले जात होते.
बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना टेन डोशेट यांनी स्पष्ट केले की, पंत आणि ज्युरेल हे दोघेही संघाच्या नियोजनाचा भाग आहेत. संघाची लाईनअप कशी असेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. या कसोटीसाठी ज्युरेल व पंत हे दोघेही संघात समाविष्ट असतील.
ज्युरेलचे प्रथम श्रेणी आकडे त्याची सातत्यपूर्ण कामगिरी अधोरेखित करतात. सप्टेंबर 2025 च्या मध्यापासून त्याने 140, 56, 125, 44, 132 आणि नाबाद 127 धावा केल्या आहेत. यामुळे त्याची कारकिर्दीतील सरासरी 47.34 वरून 58.00 पर्यंत वाढली आहे.
वृत्तसंस्थेच्या यापूर्वीच्या वृत्ताला दुजोरा देत, टेन डोशेट म्हणाले, ऋषभ पंत यष्टिरक्षण करेल, तर ज्युरेल स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळेल आणि नितीश रेड्डीला मुक्त केले आहे. विंडीजविरुद्ध मालिकेत नितीश खेळला होता. मात्र, रणनीती महत्वाची असते आणि खेळपट्टीचे स्वरूप पाहून त्यानुसार संघात बदल करावे लागतात. या रणनीतीनुसार, तूर्तास नितीशला मुख्य प्रवाहातून बाजूला व्हावे लागले आहे. याशिवाय फिरकी अष्टपैलूंमुळे आपला संघ अधिक समतोल झाला आहे. तळाच्या क्रमवारीत वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्या रूपाने आपल्याकडे खरेतर तीन फलंदाज आहेत, असे टेन डोशेट यावेळी म्हणाले, अक्षर पटेल कुलदीप यादवच्या जागी अंतिम अकरांमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने बुधवारी सकाळी ईडन गार्डन्सवर कसून सराव केला. यावेळी दुखापतीतून पुनरागमन करत असलेला कर्णधार टेम्बा बवुमा याने संघाचे ट्रेनर, फिजिओ आणि मुख्य प्रशिक्षक शुक्रु कॉनराड यांच्या देखरेखीखाली तंदुरुस्तीच्या सरावावर भर दिला.
केपटाऊन : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक सुरुवातीच्या स्पेलचा सामना कसा करायचा, यावर दक्षिण आफ्रिकेला मार्ग काढावा लागेल. फिरकी गोलंदाज सामन्यात सक्रिय होण्यापूर्वी, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बुमराहला थोपवणे दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचे ठरेल, असे मत माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने बुधवारी व्यक्त केले. फिरकीपटू सक्रिय होण्यापूर्वी वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यासमोर बळी गमावणे दोन्ही संघांना परवडणारे नाही. आशियाई उपखंडात खेळत असताना, फिरकी गोलंदाजी खेळणे हे मुख्य आव्हान असते. आता बुमराहसारखा जागतिक दर्जाचा गोलंदाज समोर असताना पहिल्या तीन फलंदाजांवर प्रारंभीच दडपण येणे साहजिक आहे, याचा स्मिथने पुढे उल्लेख केला. बुमराहप्रमाणेच रबाडा देखील भेदक गोलंदाजी करण्यासाठी सक्षम असून यामुळे भारतीय आघाडीवीरांना दक्ष राहावे लागेल, असा इशारा त्याने यावेळी दिला.
कसोटी मालिका
14 ते 18 नोव्हेंबर : पहिली कसोटी : सकाळी 9.30 वा. : कोलकाता
22 ते 26 नोव्हेंबर : दुसरी कसोटी : सकाळी 9.30 वा. : गुवाहाटी
एकदिवसीय मालिका
30 नोव्हेंबर : पहिली वन-डे : दुपारी 1.30 वा. : रांची
3 डिसेंबर : दुसरी वन-डे : दुपारी 1.30 वा. : रायपूर
6 डिसेंबर : तिसरी वन-डे : दुपारी 1.30 वा. : विशाखापट्टणम
टी-20 मालिका
9 डिसेंबर : पहिली टी-20 : सायं. 7 वा. : कटक
11 डिसेंबर : दुसरी टी-20 : सायं. 7 वा. : चंदिगड
14 डिसेंबर : तिसरी टी-20 : सायं. 7 वा. : धर्मशाळा
17 डिसेंबर : चौथी टी-20 : सायं. 7 वा. : लखनौ
19 डिसेंबर : पाचवी टी-20 : सायं. 7 वा. : अहमदाबाद