भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक टी-२० सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या सामन्यात पावसापेक्षाही अतिधुक्याचा अडथळा मोठा ठरला, ज्यामुळे खेळ होणे अशक्य झाले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यावर दाट धुक्याचे सावट अधिक गडद झाले असून, आता हा सामना होणार की नाही, याचा फैसला अवघ्या काही मिनिटांत होणार आहे. पंचांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मैदानाची पुढील आणि बहुधा अंतिम पाहणी रात्री ९:२५ वाजता केली जाणार आहे.
९:०० वाजताच्या पाहणीनंतरही पंचांनी कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही. ९:२५ ची वेळ ही सामन्याचे भवितव्य ठरवणारी 'डेडलाईन' मानली जात आहे. जर ९:२५ च्या पाहणीनंतर खेळ सुरू करण्याचा निर्णय झाला, तर सामन्यातील षटकांच्या संख्येत मोठी कपात केली जाण्याची शक्यता आहे.
पण जर ९:२५ च्या तपासणीत मैदान खेळण्यायोग्य आढळले नाही, तर चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. मात्र, क्रिकेटच्या नियमांनुसार जास्तीत जास्त वेळ खेळ सुरू ठेवण्याचा प्रयत्न पंच करणार आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील निर्णायक अशा चौथ्या टी-२० सामन्यावर दाट धुक्याने सावट धरले असून, चाहत्यांची धाकधूक शिगेला पोहोचली आहे. मैदानात धावांचा पाऊस पडेल अशी आशा असताना, धुक्याने एन्ट्री घेतल्याने सामन्याचा निकाल 'वेटिंग'वर पडला आहे.
सामना सुरू होण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असली, तरी निसर्गाच्या लहरीपणापुढे कोणाचेच चालेनासे झाले आहे. पंचांनी आतापर्यंत मैदानाची पाहणी केली आहे, मात्र अद्याप सामना सुरू करण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मैदानात दृश्यमानता फराच कमी असल्याने खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी अपडेट ही आहे की, पंचांनी आता पुढच्या तपासणीसाठी रात्री ९:०० वाजताची वेळ निश्चित केली आहे. तोपर्यंत चाहत्यांना श्वास रोखून धरावा लागणार आहे. जर धुके दूर झाले आणि दृश्यमानता योग्य अशी झाली, तरच सामन्याचा टॉस आणि पुढील खेळ पाहता येईल.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढला असून, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात निसर्गाने मोठी अडथळा निर्माण केला आहे. पावसाने नाही, तर चक्क दाट धुक्याने या सामन्याची नाकेबंदी केली असून, इकाना स्टेडियमवर खेळण्यायोग्य परिस्थिती आहे की नाही, याचा निर्णय घेताना पंचांची चांगलीच कसरत होत आहे.
पंच अजूनही साशंक; पुढील पाहणी ८:३० वाजता
मैदानावर दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचांनी आतापर्यंत अनेकवेळा खेळपट्टी आणि मैदानाचा आढावा घेतला, मात्र धुक्याचे प्रमाण कमी होत नसल्याने अद्याप नाणेफेक होऊ शकलेली नाही. पंचांनी आता रात्री ८:३० वाजता पुन्हा एकदा मैदानाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाहणीनंतरच सामना होणार की नाही आणि झाल्यास तो किती षटकांचा असेल, हे स्पष्ट होईल.
धुक्यासोबत प्रदूषणाचेही संकट
केवळ धुकेच नाही, तर लखनौमधील हवेचा दर्जा (AQI) देखील चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. मैदानावर सराव करताना हार्दिक पंड्या आणि इतर काही खेळाडू मास्क घालून वावरताना दिसले. हवेतील धुरके आणि धुके यांच्या मिश्रणामुळे खेळाडूंना श्वास घेण्यास आणि चेंडू स्पष्टपणे दिसण्यास अडचण येत आहे.
भारतीय संघात मोठे बदल?
सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सलामीवीर शुभमन गिल पायाच्या दुखापतीमुळे या सामन्यातून आणि उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनला सलामीला येण्याची संधी मिळू शकते. दुसरीकडे, वैयक्तिक कारणांमुळे रजेवर असलेला जसप्रीत बुमराह संघात परतला असून, तो मैदानात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
लखनौमधील धुक्याचं संकट वाढतच चाललं असून, मैदानावर आता 'प्रतीक्षा' लांबली आहे. पंचांनी खेळपट्टीची पाहणी केली असून पुढील अपडेट्स खालीलप्रमाणे आहेत:
लखनौ (रात्री ७:४५) : लखनौच्या इकाना स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. धुक्यामुळे विजिबिलिटी (दृश्यमानता) कमालीची कमी झाली असून, पंचांनी आता रात्री ८:०० वाजता पुढील आणि महत्त्वाची पाहणी करण्याचे ठरवले आहे.
मैदानावर काय घडलं?
पंचांची कसरत : सायंकाळी ६:५० आणि ७:३० वाजता झालेल्या दोन पाहणींनंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नसल्याचे समोर आले. पंच सातत्याने बाउंड्री लाईनपर्यंत जाऊन विजिबिलिटी तपासत होते.
खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये : धुक्याचा जोर इतका जास्त आहे की सरावासाठी उतरलेल्या दोन्ही संघांच्या खेळाडूंना पुन्हा ड्रेसिंग रूमचा रस्ता धरावा लागला.
हार्दिकचा मास्क लूक : भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या मैदानावर मास्क लावून वावरताना दिसला, जे तिथल्या प्रदूषित धुक्याची आणि थंडीची दाहकता दर्शवते.
चाहत्यांची धाकधूक वाढली
जर ८:०० वाजताच्या पाहणीत सकारात्मक अहवाल आला नाही, तर सामन्यातील षटकांची संख्या कमी केली जाऊ शकते. टी-२० मालिकेचा निकाल या सामन्यावर अवलंबून असल्याने चाहत्यांची नजर आता केवळ घड्याळाच्या काट्याकडे लागली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका विजयाचा निर्णय आज होणार होता, मात्र सध्या निसर्गाने या खेळावर वर्चस्व गाजवले आहे. लखनौच्या इकाना स्टेडियमवर धुक्याची इतकी दाट चादर पसरली आहे की, एका बाजूच्या स्टँडवरून दुसऱ्या बाजूचे प्रेक्षक दिसणेही अशक्य झाले आहे. यामुळे नियोजित वेळेत टॉस होऊ शकलेला नाही.
मैदानावर उपस्थित असलेले समालोचकांच्या माहितीनुसार, परिस्थिती अत्यंत 'भयानक' आहे. धुक्यामुळे मैदानावरील दृश्यमानता जवळपास शून्य झाली आहे.
पंचांची कसरत : पंचांनी ६:५० वाजता पहिली पाहणी केली, मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे. आता पुढची महत्त्वाची पाहणी रात्री ७:३० वाजता होणार आहे.
खेळाडूंचे काय? दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू सरावासाठी मैदानात उतरले होते, मात्र धुक्यामुळे त्यांना तातडीने ड्रेसिंग रूममध्ये परतावे लागले. हार्दिक पंड्या मैदानावर 'मास्क' लावून वावरताना दिसला, यावरून तेथील थंडी आणि धुक्याचा अंदाज बांधता येतो.
माजी खेळाडूंची चिंता
दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज डेल स्टेन याने परिस्थितीबद्दल आश्चर्य व्यक्त करताना म्हटले, ‘मी काल रात्री ८ वाजता बाहेर गेलो होतो, तेव्हा मला २० मीटर पुढचेही दिसत नव्हते. आजची परिस्थिती त्याहूनही वाईट असू शकते. अशा वातावरणात क्षेत्ररक्षण करणे खेळाडूंसाठी अत्यंत धोकादायक ठरेल. जर चेंडू हवेत गेला, तर क्षेत्ररक्षकांना तो शोधणे कठीण जाईल, ज्यामुळे दुखापतीची भीती वाढली आहे.’
सलामीवीर शुभमन गिल पायाच्या दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून (आणि कदाचित मालिकेतूनही) बाहेर झाला आहे.
चाहत्यांची निराशा
मालिका २-१ अशा रोमांचक स्थितीत असताना लखनौमधील चाहत्यांनी स्टेडियमवर मोठी गर्दी केली आहे. मात्र, खेळाऐवजी केवळ धुक्याची चादर पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जर ७:३० च्या पाहणीतही सुधारणा झाली नाही, तर षटकांची संख्या कमी केली जाऊ शकते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यावर सध्या धुक्याचे सावट पसरले आहे. लखनौच्या इकाना स्टेडियमवर थंडीचा कडाका इतका वाढला आहे की, मैदानावर दाटलेल्या धुक्यामुळे टॉस लांबणीवर पडली आहे.
प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, धुक्याची चादर इतकी जाड आहे की समोरचे स्टँड्स (प्रेक्षक गॅलरी) दिसणेही कठीण झाले आहे. त्यामुळे पंचांनी टॉस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, संध्याकाळी ६:५० वाजता खेळपट्टीची पुन्हा एकदा पाहणी केली जाईल. त्यानंतरच सामना किती वाजता सुरू होईल, हे स्पष्ट होईल.
सामना सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज शुभमन गिल पायाच्या दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून बाहेर झाला आहे. गिलच्या अनुपस्थितीत आता सलामीला अभिषेक शर्मासोबत कोण येणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दिग्गज समालोचक दीप दासगुप्ता आणि पॉमी म्बांग्वा यांनी दिलेल्या खेळपट्टीच्या अहवालानुसार :
कमी धावसंख्येचा सामना : कडाक्याची थंडी आणि खेळपट्टीला असलेला थंडावा यामुळे आर्द्रता टिकून राहणे कठीण आहे. परिणामी, आजचा सामना नेहमीप्रमाणे हाय-स्कोअरिंग न होता १५०-१६० धावांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
लाल आणि काळ्या मातीचे मिश्रण : खेळपट्टीवर चांगला बाऊन्स (उछाल) पाहायला मिळेल.
गोलंदाजांना मदत : वातावरणातील धुक्यामुळे आणि नंतर पडणाऱ्या दवामुळे वेगवान गोलंदाजांना चेंडू 'स्विंग' करण्यास मदत मिळेल.
मैदानाची लांबी : स्क्वेअर बाउंड्री ६६ मीटर असून सरळ बाउंड्री ७७ मीटर इतकी आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. मात्र, अष्टपैलू शिवम् दुबेने सूर्याची पाठराखण केली आहे. दुबे म्हणाला, ‘सूर्या हा एक फायटर आहे. तो धावा करो किंवा न करो, तो नेहमी संघासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तो एक अत्यंत धोकादायक खेळाडू आहे आणि लवकरच मोठ्या धावसंख्येत परतेल.’
लखनौमध्ये सध्या थंडीचा कडाका आणि धुके असल्याने वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला चांगली मदत मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी दव पडण्याची दाट शक्यता असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
वैयक्तिक कारणांमुळे तिसऱ्या सामन्याला मुकलेला टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतला आहे. अद्याप त्याच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले नसले तरी, त्याचे येणे गोलंदाजीला बळकटी देणारे ठरेल. दरम्यान, आजारी असल्यामुळे अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल या सामन्यातून बाहेर झाला आहे, जो भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कसोटी मालिकेत पत्कराव्या लागलेल्या २-० च्या पराभवानंतर टी-२० मालिकेत विजय मिळवणे टीम इंडियाच्या आत्मविश्वासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताने तिसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत २-१ अशी आघाडी घेतली आहे. जर भारताने आजचा सामना जिंकला, तर हा त्यांचा सलग १४ वा टी-२० मालिका विजय असेल. मात्र, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात दाखवलेली जिद्द पाहता, यजमानांना हा सामना हलक्यात घेऊन चालणार नाही.
या सामन्यात सर्वांच्या नजरा युवा सलामीवीर अभिषेक शर्मावर असतील. अभिषेकला भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक ऐतिहासिक विक्रम मोडीत काढण्यासाठी केवळ ४७ धावांची गरज आहे. एका कॅलेंडर वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अभिषेक आता कोहलीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आजच्या सामन्यात त्याने ४७ धावा केल्यास तो कोहलीचा नऊ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढून नवा इतिहास रचेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा थरार आज बुधवारी (१७ डिसेंबर) लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर रंगणार आहे. मालिकेत २-१ ने आघाडीवर असलेला भारतीय संघ आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेसाठी हा 'करो या मरो' असा सामना असून, मालिका जिवंत ठेवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.